दोन वर्षांत भरले नाही एकही पद, कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेत नाही

केवल जीवनतारे
Thursday, 5 November 2020

शासकीय दंत महाविद्यालयातील प्रशासन कोलमडले आहे. मात्र, याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील दंत विभागाच्या सहसंचालकांचे दुर्लक्ष असल्याची भावना दंतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते.

नागपूर  ः शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत प्रशासकीय अधिकारी निवृत्त झाले. मात्र, दोन वर्षांनंतरही पद भरले नाही. यामुळे येथील प्रशासनाचा भार कार्यालय अधीक्षकांवर आला. मात्र कार्यालय अधीक्षकांना मेयोतील प्रभार दिलेला आहे. यामुळे दंतमधील कर्मचाऱ्यांची कामे होत नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने डॉक्टर, परिचारिकांसह लिपिकिय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

शासकीय दंत महाविद्यालयातील प्रशासन कोलमडले आहे. मात्र, याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील दंत विभागाच्या सहसंचालकांचे दुर्लक्ष असल्याची भावना दंतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते. शासकीय दंत महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार मेडिकलमध्ये कार्यरत महिला प्रशासकीय अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. 

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 
 

हीच स्थिती मेयोची आहे. उत्तर नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालयातही प्रशासकीय अधिकारी पद रिक्त आहे. याचा फटका रुग्णांसह येथील कर्मचाऱ्यांना बसतो. याशिवाय शिष्यवृत्तीच्या भरोशावर शिकणाऱ्या मुलांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांअभावी नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दंतमधील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष भडकला आहे.

निवृत्त कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

दीड वर्षात येथील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांअभावी यांच्या निवृत्तीवेतनाचे लाभ अद्याप या कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. अद्याप निवृत्तीवेतनाची फाईल तयार नसल्याने येथील कर्मचारी दंत प्रशानाकडे खेटा घालत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांची तक्रार कुणीच ऐकून घेत नसल्याची व्यथा निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No post filled in two years in government dental hospital Nagpur