कोरोनाच नव्हे तर अतिवृष्टीने नवरात्रीत फुलांचा सुगंध हिरावला; मागणी नसल्याने भाव घटले

राजेश रामपूरकर
Sunday, 18 October 2020

टाळेबंदीमुळे सहा महिन्यांपासून फुलांची बाजारपेठ थंडावलेली आहे. गणपती आणि लक्ष्मी पूजनाच्या दरम्यान फुलांच्या बाजारात थोडीफार प्रमाणात रौनक आली होती. तीच स्थिती नवरात्रीच्या दरम्यान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावल्याने आणि मंदिरेही उघडण्यात न आल्याने फुलांचा बाजार थंडावला आहे.

नागपूर : नवरात्रीत फुलांचे मुख्य आकर्षण असल्याने बाजारपेठा सध्या झेंडू, शेवंती, निशीगंध आणि गुलांबानी बहरले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीचा फटका फुलांच्या बाजाराला बसला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी असून, मागणीही कमी आहे. त्यामुळे गतवर्षी १०० ते १२० रुपये किलो असलेल्या झेंडूचे दर घाऊक बाजारात ३० ते ४० रुपये किलोवर स्थिरावलेला आहे. याशिवाय इतरही फुलांचे दर कमीच आहेत. त्यामुळे यंदा फुलांचे दर कमी असल्याने शेतकरी आणि फूल विक्रेते हवालदिल झालेले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहक बाजारात फुले खरेदीसाठी गर्दी करीत नसल्याचे चित्र आहेत. त्यासोबतच राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने अद्यापही मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे फुलांची विक्रीही ७० टक्क्यांनी घटलेली आहे. राज्यात सर्वत्र अतिवृष्टी असल्याने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, फुलांची आवकही कमी असल्याने भाव वाढतील असा तर्क लावले जात होते. मात्र, तो तर्क चुकीच्या ठरला असून मागणीच नसल्याने फुलांचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० ते ६० टक्के कमी आहेत.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

टाळेबंदीमुळे सहा महिन्यांपासून फुलांची बाजारपेठ थंडावलेली आहे. गणपती आणि लक्ष्मी पूजनाच्या दरम्यान फुलांच्या बाजारात थोडीफार प्रमाणात रौनक आली होती. तीच स्थिती नवरात्रीच्या दरम्यान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावल्याने आणि मंदिरेही उघडण्यात न आल्याने फुलांचा बाजार थंडावला आहे. त्यामुळे फुल विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे, असे अरोमा फ्लॉवर्सचे संचालक जयंत रणनवरे यांनी सांगितले.

भीतीने भाविकही घराच्या बाहेर पडत नाही
झेंडू, शेवंती, ॲस्टर अशी रंगीबेरंगी फुले आणि पूजा साहित्याने सक्करदरा, महाल, इतवारी, खामला, धरमपेठ, बर्डी, गांधी बाग, सदर, नंदनवन, देवनगर आदी परिसरातील बाजारपेठा फुलले आहेत. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहेत. फुलांचे दरही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झालेले आहे. मंदिर अद्यापही बंदी असून कोरोनाच्या भीतीने भाविकही घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळेही फुलांची व हारांची मागणी अतिशय कमी झालेली आहे.
- शिवलाल चुटे;
फूल विक्रेते

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no price to flower in navratri