आता हे काय! आरक्षण निघाले पण उमेदवारच नाही, कोण पाहणार तीन ग्रामपंचायतींचा कारभार?

no sarpanch candidate available according to reservation due to jalalkheda in nagpur
no sarpanch candidate available according to reservation due to jalalkheda in nagpur

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर काही गावांमध्ये सरपंचपदासाठी आरक्षित प्रवर्गाचा सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला आहे. यामुळे नरखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूक होणार नाही व उपसरपंच होणारेच सरपंचपदाचा कारभार पाहणार आहे. आता यामधून प्रशासन कशा प्रकारे तोडगा काढते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे. 

नरखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण १ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले. यात नरखेड तालुक्यातील खैरगाव, मदना व पेठ इस्माईलपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाले. मात्र, या ग्रामपंचायतमध्ये संबंधित प्रवर्गाचा उमेदवार निवडून आला नसल्याने गावात सरपंचपद रिक्त राहणार आहे. त्यामुळे सध्याचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी होत असली, तरी मात्र हे जोपर्यंत रद्द होणार नाही, तोपर्यंत निवडून येणारे उपसरपंचच हे सरपंचपदाचा प्रभार पाहणार असल्याने होणाऱ्या उपसरपंचांना सरपंचपदाची लॉटरी लागणार आहे. तालुक्यातील खैरगाव, मदना व पेठ इस्माईलपूर येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती जाहीर झाले. मात्र, या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात ह्या ग्रामपंचायतीमध्ये एकही जागा आरक्षित नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवारांमध्ये या प्रवर्गातील एकही सदस्य नाही. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार नसल्याने आता सरपंचपद रिक्त राहणार आहे व निवडून येणारे उपसरपंच हेच पुढील काही दिवस सरपंच राहणार, हे मात्र नक्की. 

नरखेड तालुक्यातील जलालखेडा, उमठा व देवग्राम येथे सरपंचपदाचे आरक्षित सदस्य हे एकच असल्याने त्यांची सरपंचपदावर निवड निश्चित समजली जात आहे. जलालखेडा येथे १३ सदस्य निवडून आले. यात जनक्रांती पॅनलचे ९ सदस्य निवडून आले, तर जलालखेडा सुधार समितीचे ४ सदस्य निवडून आले. पण सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंचपद राखीव आले. यामुळे ९ सदस्य निवडून आल्यानंतर अनुसूचित जातीचा सद्स्य नसल्यामुळे अल्पमत असलेल्या जलालखेडा सुधार समिती पॅनलमधून निवडून आलेले कैलाश जगन निकोसे यांची ४ सदस्य असल्यानंतर ही सरपंचपदी निवड निश्चित मानली जात आहे. निकोसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अतुल पेठे यांच्या गटाचे आहे. 

उमठा या आदर्श गावात निवडणूक होणार नाही, असे आधी चिन्ह होते. पण निवडणूक झाली व प्रवीण दहेकर यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या तर त्यांच्या विरोधी गटाला तीन जागी समाधान मानावे लागले. पण तीन जागेमध्ये सरपंचपदाचे आरक्षित सदस्य त्यांच्याकडे असल्यामुळे अल्पमतातील प्रकश घोरपडे यांची सरपंचपदी निवड निश्चित आहे. देवग्राम येथे सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आले. पण येथे या प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग नव्हता, तरी मात्र येथे सर्वसाधारण प्रवर्गातून अनुसूचित जमातीच्या पायाल घेरेकर हे निवडून आल्या व त्यांच्या गटाकडे बहुमतदेखील आहे. यामुळे त्यांची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com