कामगारांनो सध्या आजारी पडू नका, डॉक्‍टरांची पदभरती चालू आहे...

केवल जीवनतारे
रविवार, 5 जानेवारी 2020

राज्यात 12 राज्य कामगार विमा रुग्णालयांसह 52 राज्य कामगार विमा योजनेची सेवा रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये विविध आजारांच्या अंशकालीन विशेषज्ञांची पदभरती करण्यासंदर्भात परवानगी मिळाली. सोसायटीचे मुख्य कार्य अधिकारी यांच्या नेतृत्वात ही पदभरती होणार आहे. परंतु, अद्याप पदभरतीची जाहिरातही प्रकाशित झाली नसल्याचे दिसून आले आहे.

नागपूर : राज्यातील 12 राज्य कामगार विमा रुग्णालयांत वर्षाला 10 ते 12 लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार होतात. 24 लाख विमाधारक आहेत. मात्र, त्यांच्यावरील उपचारांसाठी कामगार रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्‍टर नाहीत. कामगार रुग्णालयांत हृदयरोगतज्ज्ञ, श्‍वसनरोगतज्ज्ञांसह इतर वैद्यकीय उपचारांसाठी अंशकालीन विशेषतज्ञ डॉक्‍टरांच्या पदभरतीस हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, राज्यातील 12 कामगार रुग्णालयांत पदभरती होत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.
राज्य कामगार विमा योजना बरखास्त झाली. त्याऐवजी राज्य शासनाने राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना केली. दोन वर्षे उलटत आहेत. कामगार रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी सोसायटी कार्यान्वित झाली. पदभरतीसह औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आयुक्तांना सर्वाधिकार देण्यात आलेत. दोन महिन्यांपूर्वीपासूनच विशेषज्ञांची पदभरतीची मोहीम सुरू होणे आवश्‍यक होते. परंतु, राज्यातील कामगार रुग्णालयांत या पदभरतीसाठी अद्याप कोणतीही हालचाल दिसत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा - पुजा मिथुन जोडीला नागपुरात रंगेहात अटक, कोण आहे ही जोडी?

 

राज्यात 12 राज्य कामगार विमा रुग्णालयांसह 52 राज्य कामगार विमा योजनेची सेवा रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये विविध आजारांच्या अंशकालीन विशेषज्ञांची पदभरती करण्यासंदर्भात परवानगी मिळाली. सोसायटीचे मुख्य कार्य अधिकारी यांच्या नेतृत्वात ही पदभरती होणार आहे. परंतु, अद्याप पदभरतीची जाहिरातही प्रकाशित झाली नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे राज्यातील 24 लाख विमाधारक या उच्च दर्जाच्या सेवांपासून वंचित राहत असल्याची खंत इंटकतर्फे व्यक्त करण्यात आली.
विशेष असे की, कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात करून चालविल्या जाणाऱ्या 12 कामगार विमा रुग्णालयांमध्ये ही अवस्था आहे.

हाफकिनमुळे औषधांचा तुटवडा

राज्य कामगार विमा सोसायटी असल्याने राज्य शासनाच्या खरेदीच्या नियमाला बांधील नाही. सोसायटीला खरेदीचे व्यवहार स्वतंत्रपणे राबविण्याचा अधिकार आहे. हाफकिनच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षांपासून कामगार रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे.

डॉक्‍टरांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी.

राज्य कामगार रुग्णालयांत विशेषज्ञ डॉक्‍टरांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. साडेपाच हजार पदांपैकी सुमारे 2 हजार 700 पदे रिक्त आहेत. या पदभरतीसाठी योग्य धोरण राबवावे. अत्याधुनिक यंत्रांची खरेदी मोहीम सुरू करावी. खासगीत उपचारासाठी रेफर केल्यानंतर वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती तत्काळ मिळावी. सोसायटीच्या स्थापनेनंतर रुग्णांना योग्य उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संस्था, नागपूर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no specialist doctors in employees state insurence hospitals