दरवर्षी तब्बल १६ हजार मातांची प्रसुती होणाऱ्या रुग्णालयात ना व्हेंटिलेटर, ना अतिदक्षता विभाग; नागपूरच्या डागातील धक्कादायक वास्तव 

no ventilators and emergency wards in Daga hospital Nagpur
no ventilators and emergency wards in Daga hospital Nagpur

नागपूर ः दरवर्षी होणाऱ्या प्रसूतीच्या संख्येत विदर्भात सर्वाधिक आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ‘ना व्हेंटिलेटर आहे, ना अतिदक्षता विभाग’, अशी दयनीय अवस्था येथे आहे. गुंतागुंतीच्या वेळी मातेवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे रेफर करण्याचे धोरण डागातून राबवले जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. 

डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात दरवर्षी १५ ते १६ हजार प्रसूती होतात. डागा रुग्णालयात नैसर्गिक बाळंतपणाची सोय असली, तरी अचानक प्रकृती बिघडण्याचे प्रकार या रुग्णालयात वारंवार होतात. अशा वेळी व्हेंटिलेटरयुक्त अतिदक्षता विभाग नसल्यामुळे प्रसूतीकाळात गुंतागुंत झाल्यास तत्काळ मेडिकल किंवा मेयोत रेफर करण्यात येते. यामुळे प्रसूत महिलांचा जीव धोक्‍यात येतो. दरवर्षी अशा घटना डागामध्ये घडतात.

प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंतीतून होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सुसज्ज अतिदक्षता विभाग उभारणे आवश्‍यक आहे. मात्र, ‘सेकंडरी स्तरा’वरील रुग्णालय असल्याचे कारण पुढे करीत यातून पळवाट काढण्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आघाडीवर आहे. 

भारतात आजही प्रत्येक तासाला प्रसूतीदरम्यान महिलांचा मृत्यू होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनातर्फे डागा शासकीय स्मृती स्त्री शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय असलेला अतिदक्षता कक्ष उभारण्याची गरज आहे. अद्याप प्रसूतीचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यासंदर्भात उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव सादर केला नाही. डॉक्‍टरांची संख्याही तोकडी आहे, असे विदर्भ वैद्यकीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे म्हणाले. 

दर दिवसाला रेफरचे धोरण 

डागा रुग्णालयात नैसर्गिक बाळंतपण झाल्यानंतर अचानक प्रसूत मातेची प्रकृती बिघडल्यास थेट मेडिकलमध्ये रेफर करण्यात येते. दर दिवसाला तीन ते चार मातांना रेफर केले जोते. यामुळेच डागा रुग्णालयात मातामृत्यूची नोंद होत नाही. तर, ते मृत्यू मेडिकलच्या नोंदीत येतात. अशी खेळी डागाद्वारे खेळली जाते. विशेष असे की, डागात एकही व्हेंटिलेटर नसल्याने तेथे एमडी मेडिसीन असलेल्या फिजिशियनचीदेखील नियुक्ती करण्यात आली नाही. 

डागा हे सेकंडरी रुग्णालय आहे. यामुळे येथे व्हेंटिलेटर नाही. अवघ्या काही अंतरावर टर्शरी केअर असलेले मेडिकल आणि मेयो आहे. यामुळे येथे रेफर करण्यात येते. 
-डॉ. सीमा पारवेकर, 
वैद्यकीय अधीक्षक, डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com