कामगार रुग्णालयातील 'क्ष-किरण' विभागाचा कारभार वाऱ्यावर, ४५ वर्षांपासून नाही विशेषतज्ज्ञ

केवल जीवनतारे
Monday, 5 October 2020

कामगार रुग्णालयात गेल्या ४५ वर्षांत क्ष-किरण विशेषज्ज्ञाची आस्थापनाही तयार झाली नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथे निवासी क्ष-किरण तज्ज्ञाचे पद आहे. मात्र, ते पद रिक्त असल्यामुळे क्ष-किरण विभागाचा कारभार वाऱ्यावर आहे. 

नागपूर : विदर्भातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सांभाळण्यासाठी नागपुरात सोमवारीपेठेत एकमेव राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आहे. मात्र, या कामगार रुग्णालयात गेल्या ४५ वर्षांत क्ष-किरण विशेषज्ज्ञाची आस्थापनाही तयार झाली नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथे निवासी क्ष-किरण तज्ज्ञाचे पद आहे. मात्र, ते पद रिक्त असल्यामुळे क्ष-किरण विभागाचा कारभार वाऱ्यावर आहे. 

विदर्भात एक लाख ६० हजार विमाधारक कामगार आहेत. राज्य कामगार विमा योजनेमार्फत अल्प वेतन असणाऱ्या सर्वच क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. राज्यात १९५४ पासून ही योजना सुरू राबवण्यात येत आहे. सध्या ज्या कामगारांचे वेतन २१ हजार रुपयांपर्यंत आहे, अशा कामगारांना ही योजना लागू आहे. कामगार रुग्णालयात कामगारांना आरोग्य सेवा प्रदान करताना त्यांच्या वेतनातून १.७५ टक्के आणि कंपनी मालकाकडून ४.७५ टक्के रक्कम कपात केली जाते. अपघाताच्या रुग्णांचा एक्स रे काढावाच लागतो. मात्र, ४५ वर्षांत या रुग्णालयात क्ष-किरण विशेषज्ज्ञाचे पद मंजूर झाले नाही. त्यामुळे जाहिरात प्रकाशित करता आली नाही किंवा तात्पुरत्या स्वरुपातही येथे नेमणूक करता आली नाही. येथे इएसआयसीमार्फत सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयात डॉ. सुधाकर दुपारे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत होते. परंतु, त्यांचा कार्यकाळ संपला आहे.

हेही वाचा - सकाळ IMPACT : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय अवस्था होणार दूर, ९ एक्स-रे तंत्रज्ञांची तत्काळ...

कामगार रुग्णालय प्रशासनाच्या हातात नियुक्तीचे अधिकार नसल्याने त्यांना या पदावर नियुक्ती देता आली नाही. यामुळे आता कामगार रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र तज्ज्ञाअभावी सुरू आहे. नुकतेच २०१६ मध्ये कामगार रुग्णालयात नवीन क्ष-किरण यंत्र 'सिआर सिस्टीम' रुग्णसेवेत आले. या यंत्रावर दर दिवसाला ३० च्या वर एक्सरे काढण्यात येतात. तसेच नवीन सोनोगाफी यंत्र देखील रुग्णांच्या उपचारासाठी येणार आहे. मात्र, येथे क्ष-किरण विशेषज्ज्ञ नाही. यामुळे एक्स रे कोण बघणार, अहवाल कोण देणार? असा प्रश्न पुढे आला आहे. वरळी येथील कामगार विमा रुग्णालयातून बदली होऊन नागपूर रुग्णालयात ऑगस्टमध्ये एक महिला एक्स रे तंत्रज्ञ रुजू झाल्या आहेत. सध्या त्यांना कारकुनी काम दिल्यामुळे येथील दोन क्ष-किरण साहाय्यकांवर कामाचा भार आला आहे.  

हेही वाचा - खुशखबर! आता वीज ग्राहकांची होणारी फसवणूक थांबणार, ‘वीज ग्राहकांचे हक्क’ पुस्तक प्रकाशित

विमा रुग्णालयात कार्यरत क्ष-किरण तज्ज्ञ इसिकच्या माध्यमातून कार्यरत होते. त्यांचा कंत्राट संपला आहे. कामगार रुग्णालयात पद मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून सोसायटीकडे पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच येथे सीआर्म आले. निवासी क्ष-किरण तज्ज्ञाचे पद आहे. याचाही पाठपुरावा सुरू आहे, असे राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no x ray technician from 45 years in ESI hospital nagpur