नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची प्रत्यक्ष बैठक नाहीच ; विद्यापीठ निर्णयावर ठाम

मंगेश गोमासे
Friday, 9 October 2020

सिनेटमध्ये एकूण ७६ सदस्य असून त्यापैकी ४१ सभासद निवडणुकीच्या माध्यमातून विविध गटांमधून निवडून आलेले आहेत. या सभेच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठातील विविध प्रश्नांवर चर्चा होत असते. यातून अनेक प्रस्ताव समोर येत असतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा होत असते. मात्र, ऑनलाइन सिनेट घेतल्यास या प्रश्नांवर भरीव चर्चा होणार नाही. शिवाय विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रश्नांना सदस्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देता येणार नाही.

नागपूर : सिनेट बैठक ऑनलाइन करण्याचा निर्णयाला सिनेट सदस्यांनी विरोध दर्शविला असून त्याविरोधात कुलपती भगतसिंग कोश्यारी आणि कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निवेदन पाठवून प्रत्यक्ष बैठक घेण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालाचे आदेश असल्याचे सांगून निवेदन धुडकावून लावत सिनेट बैठक ऑनलाईनच घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिनेटमध्ये एकूण ७६ सदस्य असून त्यापैकी ४१ सभासद निवडणुकीच्या माध्यमातून विविध गटांमधून निवडून आलेले आहेत. या सभेच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठातील विविध प्रश्नांवर चर्चा होत असते. यातून अनेक प्रस्ताव समोर येत असतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा होत असते. मात्र, ऑनलाइन सिनेट घेतल्यास या प्रश्नांवर भरीव चर्चा होणार नाही. शिवाय विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रश्नांना सदस्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देता येणार नाही.

तांत्रिक गोंधळात ऑनलाईन परीक्षेचा शुभारंभ, विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

दुसरीकडे ऑनलाइन सभेचा सर्वांचा अनुभव अतिशय वाईट आहे, व्यवस्थापन परिषदेच्या ऑनलाइन सभेबद्दल व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या इतर समित्यांच्या ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सभा यशस्वी न झाल्याने त्या सभा सुद्धा प्रत्यक्ष घ्याव्या लागल्यात, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत ७६ सभासद असलेल्या सिनेटसारख्या महत्त्वपूर्ण प्राधिकरणाची सभा ऑनलाइन पद्धतीने घेणे कितपत सयुक्तिक आहे असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता. तसेच याबाबत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निवेदन पाठवून प्रत्यक्ष बैठक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सदस्याच्या या मागणीला धुडकावून लावत, राज्यपालाचा निर्देशांचा दाखला देत, सिनेट घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सदस्यांमध्ये रोष
विद्यापीठाने नियमांचे काटेकोरपणे पालन करत आपण अधिसभेची प्रत्यक्ष सभा घ्यावी. विद्यापीठाजवळ अधिसभेची सभा सामाजिक अंतर ठेवून घेण्याकरिता आवश्यक सभागृह आहे. बऱ्याच सभासदांना त्यांच्या सूचना, प्रश्न प्रत्यक्ष मांडायचे आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. या सर्व कारणांनी आपण लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करत अधिसभेची ही होऊ घातलेली सिनेट बैठक प्रत्यक्ष घ्यावी, असे निवेदन देण्यात आले होते. मात्र, आता मागणी मान्य न झाल्याने सदस्यांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not just the actual meeting of the Senate; The university insisted on the decision