esakal | 'गेम' करण्याची होती तयारी, परंतु पोलिसांनी साधली अचूक वेळ आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

Notorious accused arrested with pistol

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळातही उपराजधानीत गुन्हेगारीत कमी नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते.

'गेम' करण्याची होती तयारी, परंतु पोलिसांनी साधली अचूक वेळ आणि...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पाठीमागे पिस्तूल लपवून कुणाचातरी 'गेम' करण्यासाठी 'मिशन'वर जात असलेल्या एका कुख्यात गुंडाला गुन्हा घडण्यापूर्वीच यशोधरानगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि चार बुलेट्‌स पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील आणखी एक हत्याकांड टळल्याची चर्चा आहे. मोहम्मद जावेद अन्सारी अताऊल्ला अन्सारी (38, रा. इंदिरा मातानगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जावेद यशोधरानगरातील कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. इंदिरा मातानगर परिसरात एक आरोपी पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याची गोपनीय माहिती यशोधरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक दीपक साखरे, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, सहायक फौजदार विनोद सोलव, हवालदार मनीष भोसले यांनी घटनास्थळावर सापळा रचला.

सविस्तर वाचा - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

खबऱ्याने टीप दिल्याप्रमाणे एक आरोपी संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. तो कुणाची तरी वाट पाहत होता. त्याच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले. काही वेळानंतर त्याच्यावर अचानक झडप घालून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल आणि चार बुलेट्‌स जप्त केल्या. पिस्तूलचा परवाना विचारला असता ते त्याच्याकडे नव्हता. पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. यशोधरानगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळातही उपराजधानीत गुन्हेगारीत कमी नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे पोलिसही आपली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत. आरोपींवर बारीक नजर ठेवून त्यांचे मनसुबे उधळून त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळत असल्याचे दिसून येते.