नोकराला चाळीस हजार रुपये पगार देणाऱ्या ‘बावाजीला’ अटक; गुन्हे शाखेच्या कारवाईवर संशय

अनिल कांबळे
Monday, 5 October 2020

लाइन जवळ संशयास्पद दबा धरून बसले आहेत. पोलिसांनी लगेच सापळा रचून दबा धरून बसलेल्या संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता यात सराईत गुंड बावाजीची टोळी हाती लागली. त्यांच्या ताब्यातून लाकडी दंडा, चाकू, नायलॉन दोरी, मिरची पूड, ३ मोबाईल असे साहित्य जप्त करण्यात आले.

नागपूर : शहरातील सर्वात मोठा जुगार माफिया कुख्यात अशोक ऊर्फ बावाजी चंपालाल यादव (४०, रा. बस्तरवाडी) याच्या टोळीला पाचपावली आणि गुन्हे शाखा पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या बेतात असताना मोठ्या शिताफीने अटक केली. बावाजीच्या टोळीतील एकूण पाच दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. शे. वकील शे. मस्जिद (२६, रा. चिखली झोपडपट्टी), अभय धनराज देशपांडे (३५, रा. मोतीबाग पंजाबी लाईन), राहुल रघुनाथ पौनीकर (२४, रा. जुनी मंगळवारी) आणि विजय हरीषचंद्र चव्हाण (३०, रा. इतवारी) असे अटक करण्यात आलेल्या इतर साथीदारांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पाचपावली पोलिसांना शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, काही आरोपी लालगंज खैरीपुरा कलकत्ता रेल्वे लाइन जवळ संशयास्पद दबा धरून बसले आहेत. पोलिसांनी लगेच सापळा रचून दबा धरून बसलेल्या संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता यात सराईत गुंड बावाजीची टोळी हाती लागली.

जाणून घ्या - मन सुन्न करणारी घटना!  अंत्यसंस्कारनंतर भिक्षेकऱ्याच्या अंगावर फेकून दिली पीपीई किट; स्मशानभूमीतील दुर्दैवी वास्तव

त्यांच्या ताब्यातून लाकडी दंडा, चाकू, नायलॉन दोरी, मिरची पूड, ३ मोबाईल असे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे. ही कारवाई पाचपावली पोलिस आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज धाडगे यांच्या पथकाने केली. पाचही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

उलटसुलट चर्चेला पेव

जुगाराच्या बळावर अशोक बावाजी कोट्यधीश बनला आहे. त्याच्या जुगार अड्ड्यावर काम करणाऱ्या नोकराला जवळपास ३० ते ४० हजार रुपये पगार आहे. त्यामुळे बावाजी दरोडा टाकण्याच्या तयारीत होता, ही बाब पचनी पडत नाही. त्यामुळे गुन्हे शाखेच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. बावाजीची खामल्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यासोबत जवळीक होती. त्यामुळे एका मोठ्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notorious gambling mafia Ashok Bawaji arrested