मोठी बातमी : महापौर जोशींवरील गोळीबार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

अनिल कांबळे
शनिवार, 11 जुलै 2020

गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे दिला आहे. आता सीआयडीला महापौरावरील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात यश येईल की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 

नागपूर : गत वर्षीच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांनी गुन्हे शाखेकडे दिला होता. मात्र अजूनही गुन्हेगारांचा छडा लागलेला नाही, त्यामुळे योग्य तपास व्हावा, या दृष्टिने गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे दिला आहे. आता सीआयडीला महापौरावरील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात यश येईल की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौर संदीप जोशी हे 17 डिसेंबरला रात्री नऊ वाजता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जामठा रोडवरील रसरंजन ढाब्यावर आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून कारने ते घरी परतत होते. त्यांच्या आणि मित्रमंडळींच्या एकूण सात कार होत्या.

जवळपास दोन किमी अंतर पार केल्यानंतर दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोन युवकांनी सर्वात शेवटी असलेल्या महापौर जोशी यांच्या कारवर बेछुट गोळीबार केला. यापैकी चार गोळ्या जोशींच्या वाहनांचा भेद करून आतमध्ये घुसल्या. जोशी हे स्वतः कार चालवित होते. अचानक घडलेल्या या गोळीबारामुळे सातही वाहने लगेच थांबली. दरम्यान घटनास्थळावरून दोन्ही हल्लेखोर दुचाकीने पळून गेले. कारमधील मित्रांनी धावपळ केली तसेच पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच पोलिस मदतीसाठी धावले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्हे शाखेला अपयश ?
अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांनी महापौरांवरील हल्ल्याचा तपास विश्‍वासाने गुन्हे शाखेला दिला होता. मात्र, सात महिने उलटूनही गुन्हे शाखेला या गोळीबार प्रकरणाच्या तपासात यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास बारगळला की काय? असा संशय निर्माण झाला होता. त्यामुळे आता गृहमंत्रालयाने तपास थेट सीआयडीकडे दिला आहे.

सविस्तर वाचा - आम्हाला इतर कुठे नाही तर घरीच पाठवा; दाम्पत्याचा आयसोलेशन वॉर्डात धिंगाणा

सीआयडीचा तपास सुरू
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी महापौर जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेकडून आतापर्यंतच्या तपासाच्या फाईल्स, पुरावे, सीडीआर रेकॉर्डस आणि परिस्थितीजन्य पुरावे इत्यादी सीआयडीने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तो "गोळीबार नसून बनाव होता' अशी चर्चा मध्यंतरी होती. त्यामुळे आता सीआयडीच्या तपासात काय समोर येईल, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now CID investigeting mayors shoot