
पालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे आज मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७९ हजार ५०० रुपयांचा दंड या नागरिकांकडून वसूल केला.
नागपूर : मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून महापालिका पाचशे रुपये दंड वसूल करीत आहे. आता महापालिकेने दंडात्मक कारवाईसह गांधीगिरीही सुरू केली. दंड आकारल्यानंतर महापालिका संबंधित व्यक्तीला मास्कही देत आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांच्या जीवन पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी दंड केल्यानंतर त्यांना मास्क देण्याचे आदेश दिले. नागरिकांमध्ये मास्क लावण्याची वृत्ती निर्माण व्हावी, यासाठी आयुक्तांनी हा पुढाकार घेतला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी महापालिकेची गांधीगिरी नागरिकांना चांगली सवय लावण्यासाठी असल्याचे सांगितले.
पालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे आज मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७९ हजार ५०० रुपयांचा दंड या नागरिकांकडून वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क वितरित करण्यात आले. मागील काही दिवसांत शोध पथकांनी २१,४७९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ९० लाख ९८ हजारांचा दंड वसूल केला आहे.
सविस्तर वाचा - व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या
आज उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर व धंतोली झोनमध्ये प्रत्येकी २५, धरमपेठमध्ये २१, हनुमाननगरमध्ये २५, धंतोली व सतरंजीपुरामध्ये प्रत्येकी ८, नेहरुनगरमध्ये १२, गांधीबागमध्ये ९, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोनमध्ये १३, मंगळवारी झोनमध्ये २८ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांवर दंडात्मक कारवाई करीत मास्क वितरित करण्यात आले.
संपादन - नीलेश डाखोरे