आता तर ग्रामस्थांच्या आरोग्यातही होतेय राजकारण, पहा कसे...

संदीप गौरखेडे
Thursday, 15 October 2020

साडेपाच कोटी खर्च करून भलीमोठी आरोग्य केंद्राची इमारत तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला. मात्र शोभेचा ठरत असलेला ‘पांढरा हत्ती’ जागचा हलत नाही.  रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने आजही या भागातील लोकांना आरोग्याचा प्रश्‍न त्रस्त करतोय.

कोदामेंढी (जि.नागपूर) : गावात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम झाले. योगायोगाने आमदार देखील त्यांचेच पतीदेव झाले. जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीही याच गावचे. त्यामुळे लोकांचा आनंद गगणात मावेनासा झाला. साडेपाच कोटी खर्च करून भलीमोठी आरोग्य केंद्राची इमारत तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला. मात्र शोभेचा ठरत असलेला ‘पांढरा हत्ती’ जागचा हलत नाही.  रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने आजही या भागातील लोकांना आरोग्याचा प्रश्‍न त्रस्त करतोय.

अधिक  वाचाः काय सुरू आहे वाडीत ? नाल्या झाल्या वर अन् दुकाने खाली !

इमारत असून धानला येथील आरोग्य केंद्रात सुविधाच नाही
मौदा येथे ग्रामीण रुग्णालय तयार झाल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र चिरव्हा येथे हलविण्यात आले. चिरव्हा प्राथमिक केंद्रांतर्गत धानला येथे उपकेंद्र आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक दवाखाना देखील आहे. तिथे डॉक्टर आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र तिथे उपचार मिळत नसल्याची ओरड गावकऱ्यांची आहे.  शासनाने इतके रुपये खर्च करून भलीमोठी इमारत तयार केल्याने आता येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी घेणे गरजेचे झाले आहे. आरोग्य केंद्राची रुग्ण कल्याण समितीही तयार झाली आहे. लोकसंख्यानुसार येथे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे, मात्र तेही कंत्राटी पद्धतीने. येथील आरोग्य केंद्र सुरु झाल्यास आयुर्वेदिक दवाखाना निमखेडा येथे हलविण्याची शक्यता आहे. परिसरातील दहेगाव, चिचोली, धानला, आष्टी, ढोलमारा, पिपरी, खंडाळा, चारभा, मांगली (तेली), सुंदरगावं, नवेगाव, बोरगाव आदी परिसरातील रुग्णांना येथील आरोग्य केंद्रात तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा मिळेल. आरोग्य केंद्र सुरु न झाल्याने या भागातील रुग्णांना तपासणी आणि औषधोपचाराकरिता भंडारा आणि मौदा येथे भटकंती करावी लागत आहे.  

अधिक वाचाः परतीचा पाऊस आभाळातून नव्हे, ढसा ढसा डोळ्यातून बरसला !
 

आरोग्य केंद्र सुरु होणे गरजेचे
राजकारणी गाव आहे. सत्ताबदल झाल्याने राजकारण आड येत आहे. त्यामुळे अद्याप उद्घाटन झाले नाही. आरोग्य केंद्र सुरु होण्यासाठी काही अडचण नाही. पण येथे आपापले  वर्चस्व दाखविले जात आहे. करोडो खर्च करून इमारत बनली, मात्र आरोग्याची सुविधा मिळत नसल्याचा खेद आहे. जनतेच्या सोयीसाठी आरोग्य केंद्र सुरु होणे गरजेचे आहे.
बंडू वैरागडे
धानला (मनसे विधानसभा अध्यक्ष)

आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर उपोषण करू
आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे पाठपुरावा केला. मागणीच्या अनुषंगाने तात्काळ आरोग्य केंद्र सुरु करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले. मात्र आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देतात. येथील आरोग्य केंद्र सुरु ना झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षासमोर बेमदत उपोषण करू.
राम वाडीभस्मे
मुख्य संयोजक किसान अधिकार मंच  

पाठपुरावा सुरु आहे !
पदभरती सुरु आहे. सध्या मी क्वारंटाईन आहे. पदभरती झाली की सुरु होईल. पाठपुरावा सुरु आहे.
टेकचंद सावरकर, आमदार

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now even in the health of the villagers, politics is happening, see how.