ग्राहकांनो, मिठाई खरेदी करताय? मग आता ‘एक्स्पायरी डेट' बघूनच विकत घ्या; नवीन नियम होणार लागू   

राजेश रामपूरकर 
Wednesday, 30 September 2020

आत्तापर्यंत पॅकेटबंद खाद्य पदार्थ अथवा मिष्टान्नांच्या पाकिटांवरती मुदतबाह्य तारीख नमूद करणे बंधनकारक होते. मात्र अलीकडे खुल्या पद्धतीने विक्री होणाऱ्या मिष्टान्नांतून अन्न विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आहे आहेत.

नागपूर : मिठाईच्या दुकानातील 'ट्रे'वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते (एक्स्पायरी डेट) काय आहे. कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकणे (बेस्ट बीफोर डेट) अन्न व औषधी प्रशासनाने अनिवार्य केले आहे.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी काढलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. 

या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद

याची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. यामुळे सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतबाह्य (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे. 

आत्तापर्यंत पॅकेटबंद खाद्य पदार्थ अथवा मिष्टान्नांच्या पाकिटांवरती मुदतबाह्य तारीख नमूद करणे बंधनकारक होते. मात्र अलीकडे खुल्या पद्धतीने विक्री होणाऱ्या मिष्टान्नांतून अन्न विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आहे आहेत. यामुळेच शासनाने आता बाजारात खुल्या पद्धतीने विक्री होणाऱ्या मिष्टान्नांच्या ट्रेवर अथवा भांड्यावर मुदतबाह्य तारीख नमूद करणे बंधनकारक केले आहे. 

विना पॅकिंग असणारा पदार्थ कधी बनविला आहे अथवा तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते. शिळे अन्न पदार्थ खाल्याने विषबाधा होऊ शकते. हे लक्षात घेऊनच ट्रेमधील अन्न पदार्थ विक्री करताना मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री करता येणार नाही. 

पुढील लक्षणं देतात मधुमेहाच्या त्रासाची पूर्वसूचना; आजच ओळखा आणि भेटा डॉक्टरांना

जिल्ह्यातील सर्वच मिठाई उत्पादक व विक्रेते यांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त यांनी केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now it is compulsory to write expiry dates on sweets box