
फटाके फोडणारी बुलेट थेट जप्त करा. पोलिस ठाण्यात जमा करा. चालक मुलांकडून चावी घेऊन ठराविक दिवशी वडीलासह उपस्थित करण्याचे आदेश दिले. नव्या उपक्रमामुळे दिडशे बुलेट पोलिसांनी जप्त केल्या.
नागपूर ः शहरात फटाके फोडत बुलेटची सवारी करणारे अनेक बाईकस्वार दिसतात. रस्त्यावरील वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी विनाकारण फट्ट असा मोठा आवाज करीत बुलेटचे फटाके फोडतात. या प्रकाराला अनेक जण कंटाळले होते. वाहतूक पोलिसांनीही अनेकदा दंडात्मक कारवाई केली. परंतु, हा प्रकार थांबत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जालिम उपाय शोधला.
फटाके फोडणारी बुलेट थेट जप्त करा. पोलिस ठाण्यात जमा करा. चालक मुलांकडून चावी घेऊन ठराविक दिवशी वडीलासह उपस्थित करण्याचे आदेश दिले. नव्या उपक्रमामुळे दिडशे बुलेट पोलिसांनी जप्त केल्या. चालक मुले आणि त्यांच्या वडीलांना पोलिस जिमखाण्यात बोलावण्यात आले. मुलांसह त्यांच्या वडीलांचाही आयुक्तांनी ‘क्लास’ घेतला. दंडात्मक कारवाई केल्यानंतर पालकांच्या स्वाधीन दुचाकी करण्यात आल्या. या उपक्रमाचे राज्यभर कौतूक होत असून अन्य शहरातही असाच उपक्रम राबवावा असा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे असल्याची माहिती आहे.
शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी नियोजन केले. तसेच अपघातांची कारणे शोधली. त्यामध्ये अल्पवयीन चालक, बुलेट चालक, अप्रशिक्षित वाहनचालक, ट्रिपल सिट आणि रॅश ड्रायव्हींगमुळे होणारे अपघाताचा संख्या जास्त असून त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अशा वाहनचालकांवर वारंवार दंडात्मक कारवाई करण्यात येते, परंतु पाचशे-हजार रूपये दंड भरून पुन्हा तोच प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कायमचा बंदोबस्त करण्यासाठी डीसीपी आवाड यांनी थेट दुचाकी जप्तीचा धडाका सुरू केला. गेल्या १५ दिवसांत जवळपास १५० दुचाकी जप्त करण्यात आल्या.
दहा दिवसांनी या...
अल्पवयीन आणि ट्रिपल सिट वाहन चालविताना दिसल्यास ट्रॅफीक पोलिस दुचाकी थांबवितात. दुचाकी पोलिस ठाण्यात जप्त करतात. मुलाच्या हातात पावती देऊन पालकांसह पोलिस जिमखान्यात १० दिवसांनंतर आयोजित समूपदेशन कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात. पालकांसह उपस्थित झालेल्या कार्यक्रमात डीसीपी आवाड अपघात होण्याची कारणे आणि अपघातात अपंगत्व आलेल्यांचे व्हीडिओ दाखवतात. त्यानंतर आयुक्त अमितेश कुमार पालकांना उपदेशाचे ‘डोज’ देतात.
वाहतूकीला शिस्त लागेल
कुणालाही त्रास व्हावा म्हणून नव्हे तर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून हा उपक्रम पोलिसांनी आखला आहे. अपघातात जीव जाऊ नये किंवा अपंगत्व येऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. पालकांनीसुद्धा अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये
- सारंग आवाड,
पोलिस उपायुक्त (ट्रॅफिक)
संपादन - अथर्व महांकाळ