एसटी महामंडळाचा "कार्पोरेट' बाणा, प्रवासी वाहतुकीबरोबरच करणार माल वाहतुकही

st_mahamandal
st_mahamandal

नागपूर : प्रवासी वाहतूकीसोबतच मालवाहतूक रेल्वेद्वारे अनेक वर्षांपासून केली जाते. किंबहुना प्रवासी वाहतूकीपेक्षा रेल्वे वाहतूकीतूनच रेल्वेला अधिक महसूल प्राप्त होतो. एसटी महामंडळाने मात्र केवळ प्रवासी वाहतूकीवरच आपले लक्ष केंद्रीत केले होते. वाहतुकीची अन्य साधने काळानुसार जसजशी उपलब्ध होत गेली तसतसा एसटीचा तोटा वाढत गेला, मात्र एसटीने आपले धोरण बदलले नव्हते. आता मात्र एसटीने काळानुसार आपली पावले उचलण्याचा निर्णय घेत मालवाहतुक करण्याचेही ठरविले आहे. आणि खाजगी मालवाहतुकीपेक्षा एस टीने आपले दरही तुलनेने कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कारखानदार आणि व्यावसायिकांच्या भेटीचे सत्रही एस टी ने सुरू केले आहे
वर्षानुवर्षे तोटा सोसणाऱ्या एसटी महामंडळाने आता व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. प्रवाशांसोबतच मालवाहतुकीतून महसुली स्थिती सुधारण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मालवाहतुकीला चालना देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने "कार्पोरेट' बाण्याने कारखानदार, व्यावसायिकांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू केले असून त्याला यशही मिळू लागले आहे. सुरक्षित, वक्तशीर आणि किफायदशीर दर या बळावर महामंडळ "ट्रान्सपोर्ट' क्षेत्रात जम बसवेल, असा विश्‍वास अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.
लॉकडाउनच्या काळात मालवाहतूक थांबल्याने अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. मालपुरवठ्याची शृंखलाच खंडित झाली आहे. या कठीण स्थितीला संधी मानून एसटी महामंडळाने मालवाहतुकीला चालना दिली आहे. व्यापारी, दुकानदार, लहान मोठे कारखानदार, शेतकरी अशा सर्वांच्याच मालाची वाहतूक करण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखविली आहे. राज्य स्तरावर 10 दिवसांमध्ये एसटीला 95 ट्रिप मिळाल्या आहेत. दररोज 12 ते 15 फेऱ्यांची ऑर्डर महामंडळाला मिळत आहे. नागपूर विभागातसुद्धा या सेवेचा शुभारंभ झाला आहे. विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्या नेतृत्वात या सेवेला अधिकाधिक प्रतिसाद मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बुटीबोरीसह, हिंगणा, कळमेश्‍वरसह एमआयडीसी, शहरातील कळमना मार्केटसह अन्य मोठ्या बाजारपेठा तसेच इतवारीसारख्या व्यावसायिक भागातील व्यावसायिकांच्या भेटी घेऊन मालवाहतुकीसंदर्भात माहिती दिली जात आहे.
प्रती किलोमीटर 28 रुपये दर
प्रती किलोमीटर 28 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी या दराने एसटी महामंडळाकडून मालवाहतूक केली जात आहे. म्हणजेच ग्राहकांना शंभर किलोमीटरपर्यंत 8 ते 9 टन मालवाहतूकीसाठी येणारा खर्च 3 हजार 400 च्या घरात राहील. खासगी ट्रान्सपोट कंपन्यांच्या तुलनेत हे दर फारच कमी आहेत.

एका दिवसात प्रवासी वाहतूकही शक्‍य
एसटी महामंडळाकडून मालवाहतुकीसाठी जुन्या बसेसच वापरल्या जाणार आहेत. केवळ सीट काढणे, केबीन बंद करणे यासारखे मोजके आणि सहज बदल केले जात आहेत. गरज भासल्यास हे ट्रक अगदी एका दिवसात पुन्हा प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज केले जाऊ शकतील.
चार ट्रकमधून मालवाहतूक
ट्रान्सपोर्ट लॉबी अडचणीत आहे. तर एसटी महामंडळाकडे असणारे "असेट' ही जमेची बाजू आहे. सध्या चार ट्रकमधून मालवाहतूक केली जाईल. गरजेनुसार येणाऱ्या मागणीनुसार वाहने वाढविली जातील.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com