उपराजधानीत बाधितांची वाटचाल लाखाकडे; २४ तासात दगावले ३६ जण  

केवल जीवनतारे
Thursday, 1 October 2020

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १) झालेल्या ३६ मृत्यूंमध्ये शहरातील २९ मृत्यू आहेत. तर ४ जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरचे ३ जण दगावले आहेत. विशेष असे की, आज मेयोमध्ये १० जण दगावले आणि मेडिकलमध्येही १० जण दगावले आहेत.

नागपूर  ः सलग पाचव्या दिवशी १ हजार ३१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल जिल्ह्यातील सात प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. गेल्या ८ दिवसांमधून संक्रमितांची संख्या कमी होत आहे. तर २४ तासात ३६ मृत्यू  झाले. तर ११९७ लोक बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सलग पाचव्या दिवशी कमी बाधित आढळले.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १) झालेल्या ३६ मृत्यूंमध्ये शहरातील २९ मृत्यू आहेत. तर ४ जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरचे ३ जण दगावले आहेत. विशेष असे की, आज मेयोमध्ये १० जण दगावले आणि मेडिकलमध्येही १० जण दगावले आहेत. खासगी रुग्णालयात उर्वरित १६ जण दगावले आहेत. जिल्ह्यात आज ६ हजार ३०० चाचण्या करण्यात आल्या. 

यातील सर्वाधिक १३७८ चाचण्या या खासगीत प्रयोगशाळेत झाल्या आहेत. एम्समध्ये २६२ चाचण्या झाल्या आहेत. मेयोत ६१२ तर मेडिकलमध्ये ४७५ चाचण्या झाल्या आहेत. उर्वरित १७१ नीरी तर ८८ चाचण्या माफसू येथील प्रयोगशाळेत झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्थगिती दिलेली खासगी प्रयोगशाळादेखील सुरू करण्यात आली. यामुळे खासगीतील टक्का अधिक वाढला आहे. 

जाणून घ्या - चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक् 
 

११९७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६३ हजार ४६४ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या २ हजार ५४६ मृत्यूंमध्ये शहराच्या विविध भागातील १८५४ मृत्यू झाले आहेत. तर ग्रामीण भागातील मृत्यूची संख्या ४४४ आहे. जिल्ह्याबाहेरून मेयो,मेडिकलमध्ये रेफर केल्यानंतर दगावलेल्यांची संख्या २४८ आहे. नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. नागपूर जिल्ह्यासाठी हे चांगले वृत्त आहे. गुरूवारी नव्याने बाधा झालेल्या १०३१ बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात ८० हजाराच्या जवळ बाधितांचा आकडा पोहचला आहे, तर आतापर्यंत २५४६ जण दगावले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या घटली

नागपूर जिल्ह्यात आठ दिवसांपुर्वी कोरोनाबाधित असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार होती. आठ दिवसांमध्ये चार हजाराने घट झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ हजार ८३३ वर आली आहे. ही बाब स्थानक प्रशासनाला दिलासा देणारी आहे. विशेष असे की, मेयो मेडिकलमधील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मेयो-मेडिकलमध्ये २१२५ मृत्यू

एकीकडे कोरोनाचा वाढता विळखा अंशत: का होईना सैल होताना दिसतो आहे. कधीकाळी एकाच दिवशी ५९ मृत्यू वरून हा मृत्यूचा आकडा ३६ वर आला आहे. १ एप्रिल ते १ऑक्टोंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यात २५४६ मृत्यूंची नोंद झाली. मृत्यू सत्राचा हा वाढता आलेखही चिंतेत भर घालणारा ठरत आहे. तरी देखील काही प्रमाणात मृत्यू घडले आहेत. विशेष असे की, एकूण मृत्यूंपैकी २१२५ मृत्यू हे एकट्या मेयो आणि मेडिकलमध्ये झाले आहेत. ११११ मृत्यू हे मेडिकलमध्ये तर १०१४ जण मेयोत दगावले आहेत.  

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients in nagpur is around eighty thousand