चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक् 

शशांक देशपांडे
Wednesday, 30 September 2020

दर्यापुरातील रोहिदासनगर येथे वास्तव्यास असलेला बांधकाम कामगार गौतम डोंगरदिवे (वय 38) हा युवक दर्यापूर पोलिस ठाण्यात सुरू असलेल्या बांधकामावर कामगार म्हणून होता. मागील 20 दिवसांपूर्वी कामावर असताना अपघात होऊन तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला होता.

दर्यापूर (जि. अमरावती) : देव तारी त्याला कोण मारी, म्हणतात ते काही खोटे नाही.  कधी कधी एखाद्याचे अचानक जाणे मनाला चटका लावून जाते, तर कधी कधी मृत्यूच्या दाढेत असलेला व्यक्ती सहीसलामत परत येतो.  काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असे म्हणायला भाग पाडणारी घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात उघडकीस आली. रचलेली चिता उचलून टाका, असे सांगताना कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत या घटनेची चर्चा आहे.

जीवनाची दोरी पक्की असेल तर कोणत्याही संकटातून व्यक्ती सहीसलामत बाहेर पडतो. एखादवेळी विज्ञानालासुद्धा अवाक्‌ होऊन केवळ बघावे लागते. अशीच घटना दर्यापुरातील रोहिदासनगरात घडली. डॉक्‍टरांनी मृत घोषित केल्यावर केलेल्या उपचारांना उशिरा दाद मिळाल्याने युवकाचे प्राण वाचले.

दर्यापुरातील रोहिदासनगर येथे वास्तव्यास असलेला बांधकाम कामगार गौतम डोंगरदिवे (वय 38) हा युवक दर्यापूर पोलिस ठाण्यात सुरू असलेल्या बांधकामावर कामगार म्हणून होता. मागील 20 दिवसांपूर्वी कामावर असताना अपघात होऊन तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला होता. उपचाराकरिता त्याला दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून अमरावती व स्थिती गंभीर असल्याने तातडीने नागपूरला उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
 

काही दिवसांच्या उपचारांना कोणतीही दाद न मिळाल्याने मंगळवारी (ता. 29) त्याची प्राणज्योत मालवली. तेथील डॉक्‍टरांनी मृत घोषित केल्याचा निरोप दर्यापुरात येऊन धडकला. नातेवाईक, मित्र परिवाराला मोठा धक्का बसला, घरी रडारड सुरू झाली. नातेवाइकांनी नागपूरवरून रुग्णवाहिकेने त्याचे शव दर्यापूरला आणण्याची व्यवस्था केली. दर्यापुरातील स्मशानातसुद्धा वर्दी देण्यात आली. काहींनी लाकडे आणून स्मशानात व्यवस्था केली, तर काहींनी मरणाचे साहित्य आणले. एवढेच नाही तर स्मशानातील व्यवस्थापकाने चितेवर लाकडे रचलीसुद्धा. 

बराच वेळ झाला असून रुग्णवाहिका आली नसल्याने मित्रांनी चौकशी केली. मात्र तिकडचा निरोप ऐकून कुणाचाच आपल्या कानावर विश्‍वास बसेना. गौतम डोंगरदिवे यास पुन्हा चेतना आल्याने रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू झाल्याची बातमी कळाली. मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाली, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मृत व्यक्ती जिवंत झाला कसा? याबाबत चर्चा सुरू झाली.

इकडे स्मशानभूमीतील व्यवस्थापकाने चितेवरील लाकडे रचून खूप वेळ लागत असल्याने गौतमच्या  घरी विचारणा केली. कुटुंबीयांनी गौतम जिवंत असल्याचे सांगत रचलेली चिता काढून टाकावी, अशी सूचना केली. गौतम डोंगरदिवे या युवकावर आता पुन्हा नागपुरात उपचार सुरू झाले आहेत. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survived the life of a young man declared dead by doctors