कोरोनारुग्णांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर; शनिवारी नवे ९८४ बाधित, दहा जणांचा मृत्यू

राजेश प्रायकर
Saturday, 27 February 2021

ग्रामीण भागातील ७७२ तर जिल्ह्याबाहेरील ७५८ लोकांना कोरोनामुळे मृत्यू आला. दररोज वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ हजार ९३४ सक्रिय रुग्ण असून कालच्या तुलनेत ४८९ जणांची आज भर पडली.

नागपूर : गेल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर आहे. शनिवारीही ९८४ बाधित आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांतही वाढ झाली असून, आठ हजारांपर्यंत पोहोचली आहे. २४ तासांत दहा जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. यात शहरातील सहा जणांचा समावेश असल्याने प्रशासन आणखी कठोर पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने हजार किंवा त्यावर आहे. शनिवारीही ९८४ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यात शहरातील ७३४ तर ग्रामीणमधील २४७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक लाख ४८ हजार ८८९ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील १ लाख १८ हजार ७७२ जणांचा समावेश असून, गेल्या पंधरवड्यात झपाट्याने बाधितांची संख्या वाढली.

अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?

ग्रामीण भागातील बाधितांची संख्याही तीस हजारांच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील सहा जणांचा समावेश असून, ग्रामीण भागातील एक तर जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ४ हजार ३३० पर्यंत पोहोचला आहे. यात शहरातील दोन हजार ८०० जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील ७७२ तर जिल्ह्याबाहेरील ७५८ लोकांना कोरोनामुळे मृत्यू आला. दररोज वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ हजार ९३४ सक्रिय रुग्ण असून कालच्या तुलनेत ४८९ जणांची आज भर पडली. यात शहरातील ६ हजार ६९९ रुग्ण आहेत. ग्रामीण भागातही १,२३५ रुग्ण विलगीकरणात आहेत. शनिवारी १३ हजार २७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहे.

जाणून घ्या - संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर

८८२ रुग्ण कोरोनामुक्त

शनिवारी ८८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या एक लाख ३६ हजार ६२५ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील १ लाख १० हजार तर  ग्रामीण भागातील २६ हजार ६१० जण कोरोनामुक्त झाले.

१५ दिवसांत ११ हजार रुग्ण

पंधरा दिवसांत ११ हजार ७५ रुग्ण वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. १२ फेब्रुवारीला एक लाख ३७ हजार ८१४ रुग्ण होते. शनिवारी १ लाख ४८ हजार ८१४ एकूण बाधित रुग्ण आहेत. यातूनच कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients is on the threshold of one and a half lakh