नागपूरकरांनो सावधान! कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे; आज नव्या ४५७ रुग्णांची भर  

राजेश प्रायकर 
Friday, 27 November 2020

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी ८ जणांनी आज शेवटचा श्वास घेतला. ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एकाचा समावेश असून शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला.

नागपूर ः गेल्या काही दिवसांत कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे दररोजच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले असून आरोग्य अधिकाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांच्या जीवालाही घोर लागला आहे. आज शहरातील सहा जणांसह जिल्ह्यातील आठ जण कोरोनाचे बळी ठरले. काल शहरातील मृतकांची संख्या पाच होती. यात आज एकाने भर पडली. बाधितांमध्येही कालच्या तुलनेत पाचने भर पडली. गेल्या २४ तासांत ४५७ नवे बाधित आढळून आले.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी ८ जणांनी आज शेवटचा श्वास घेतला. ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एकाचा समावेश असून शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला. या आठ मृत्यूसह एकूण मृत्यूची संख्या ३ हजार ६३६ पर्यंत पोहोचली. यात २ हजार ५२१ शहरातील आहेत. ग्रामीणमधील ६२२ तर जिल्ह्याबाहेरच्या ४९३ जणांनी शहरात प्राण सोडले.

सविस्तर वाचा - व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

शुक्रवारी शहरातील विविध लॅबमध्ये तपासणीसाठी आलेल्या ६ हजार ९३८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील ४५७ जण बाधित आढळून आले. यात ३७७ शहरातील असून ७९ ग्रामीण भागातील आहे. एक जण जिल्ह्याबाहेरील आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख १० हजार ७८९ पर्यंत पोहोचली. यातील ८७ हजार ५३० शहरातील असून २२ हजार ५८४ ग्रामीण भागातील आहेत. ६७५ बाधित शहराबाहेरील आहेत. बाधितांची संख्या वाढत असल्याने आजघडीला ५ हजार २ बाधित उपचार घेत आहेत. यातील ४ हजार ३७७ रुग्ण शहरातील असून ६२५ ग्रामीण भागातील आहेत. 

५ हजार २ रुग्णांपैकी ३ हजार ४८३ घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत १ लाख २ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात ८० हजार ६३२ शहरातील असून २१ हजार ५१९ ग्रामीण भागातील आहेत. आज २६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील २३७ तर ग्रामीण भागातील २५ जणांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा कमी झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा ९२ टक्क्यांवर आले आहे. यापूर्वी हे प्रमाण ९३ टक्क्यांवर होते.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

तीन विमानप्रवाशी पॉजिटिव्ह, १२७० रेल्वे प्रवाशांची तपासणी

जयपूर तसेच दिल्लीवरून काल, गुरुवारी आलेल्या चार विमान प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात आली. जयपूरवरून आलेल्या चार्टरर विमानातील ६१ प्रवाशांनी महाराष्ट्रात प्रवास करायचा असल्याने आधीच तपासणी केली होती. दिल्ली येथून आलेल्या वेगवेगळ्या चार विमानातील ४६१ पैकी ८१ प्रवाशांची चाचणी विमानतळावर करण्यात आली. यातील तिघांचा चाचणी अहवाल आज पॉजिटिव्ह आला. काल, १२ प्रवाशी पॉजिटिव्ह आढळले होते. रेल्वे स्टेशनवर वेगवेगळ्या ट्रेनने येणाऱ्या १२७० जणांची तपासणी करण्यात आली. यात कुणीही पॉजिटिव्ह आढळले नाहीत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: numbers of corona patients are increasing in Nagpur