खबरदार! नायलॉन मांजा विकला किंवा खरेदी केला तर; ३१ जानेवारीपर्यंत राहणार हा आदेश लागू

अनिल कांबळे
Sunday, 3 January 2021

नायलॉनचा मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो. मांजामुळे नाक, कान, गाल कापले जाऊन चेहरा विद्रूप बनतो. अनेकांच्या जिवावर बेतते. मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होतात. पक्ष्यांच्या जीविताचीही मांजामुळे हानी होते. गेल्या वर्षी पतंगबाजांमध्ये हाणामारीत एकाचा खूनही झाल्याची घटना सक्करदऱ्यात घडली होती.

नागपूर : मानकापुरात एका विद्यार्थ्याचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची घटना समोर येताच पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना टार्गेट केले आहे. बंदी असतानासुद्धा नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री होत असल्यामुळे पोलिस आक्रमक झाले आहेत. विक्रेत्यांसह नायलॉन मांजा वापरून पतंगबाजी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

मकर संक्रांतीला उपराजधानीत पतंगबाजीला जोर चढतो. बालगोपालांसह मोठ्यामध्ये पतंगबाजांची हुल्लडबाजी आतापासूनच सुरू झाली आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पतंगबाजी होत असल्यामुळे अनेकांची कटलेली पतंग लुटण्यासाठी लहान मुले धावपळ करीत आहेत. पतंगाची काटाकाटी करण्यासाठी नायलॉन मांजाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंदी असतानाही पतंग विक्रेते नायलॉन मांजा चोरून विकतात.

अधिक माहितीसाठी - पेन, पेन्सिल बघून सूचली कल्पना अन् तयार केला चक्क बाराशे मीटर उडणारा ड्रोन

नायलॉन मांजाला जास्त किंमत मिळत असल्यामुळे चार पैसे कमवण्यासाठी दुकानाऐवजी बाजूच्या घरात नायलॉन मांजा ठेवत आहेत. तीन दिवसांपूर्वी आदित्य भारद्वाज नावाच्या तरुणाचा गळा कापला गेला, तर एआयडीसीत पतंगाच्या मागे धावत सुटलेल्या एका यश नावाच्या मुलाचा वाहनाने उडविल्यामुळे जीव गेला.

नायलॉनचा मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो. मांजामुळे नाक, कान, गाल कापले जाऊन चेहरा विद्रूप बनतो. अनेकांच्या जिवावर बेतते. मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होतात. पक्ष्यांच्या जीविताचीही मांजामुळे हानी होते. गेल्या वर्षी पतंगबाजांमध्ये हाणामारीत एकाचा खूनही झाल्याची घटना सक्करदऱ्यात घडली होती.

क्लिक करा - ‘माझ्यावर जबाबदारी आहे; परंतु, माझा नाइलाज आहे’ अशी चिठ्ठी लिहून बिल्डरची आत्महत्या

३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कलम १४४ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार आदेश जारी केला आहे. त्यानुसार, नायलॉन मांजाची विक्री करणे, साठवणूक करणे आणि वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करून कुणी नायलॉन मांजाची विक्री अथवा साठवणूक आणि वापर करताना दिसल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. १ ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. दुकानदारांसह आता नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nylon manja sellers targeted by police