पेन, पेन्सिल बघून सूचली कल्पना अन् तयार केला चक्क बाराशे मीटर उडणारा ड्रोन

प्रशिक मकेश्‍वर
Sunday, 3 January 2021

सर्वप्रथम चार महिन्यांआधी घरातीलच वस्तू एकत्र करीत पेनाची कॅप, पेन्सिल, बॅटरीची जोडणी केली व गावातच या ड्रोनची ट्रायल घेतली.

तिवसा (जि. अमरावती) : सध्याचे युग हे स्मार्टफोन, इंटरनेटच्या माध्यमातून झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे आजची तरुणाई व लहान मुलेही नवनवीन उपक्रम राबविण्याचा एक छंद जोपासत नवीन यंत्र तयार करताना दिसत आहेत. अशाचप्रकारे कोरोनाच्या महामारीत शाळा व महाविद्यालये बंद असल्याने या वेळेचा सदुपयोग करून मोझरीच्या विश्‍वजितने बाराशे मीटर लांब उडणारा ड्रोन तयार केला आहे. विशेष म्हणजे, घरातील टाकाऊ वस्तूंसह पेन, पेन्सिल, बॅटरी, अशा वस्तूंचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केला आहे.  

हेही वाचा - राज्य सरकारचा प्रवास उलट दिशेने! सरपंचपदाचे आरक्षण...

विश्वजीत किशोर बायस्कर, असे या मुलाचे नाव असून तो गुरुदेव विद्यामंदीर येथे शिक्षण घेतो. सर्वप्रथम चार महिन्यांआधी घरातीलच वस्तू एकत्र करीत पेनाची कॅप, पेन्सिल, बॅटरीची जोडणी केली व गावातच या ड्रोनची ट्रायल घेतली. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गेल्याने विश्‍वजितचा आपल्या ड्रोनवरील ताबा सुटला होता. तेव्हा ड्रोन हरविल्याने त्याने पुन्हा बनविण्याचा संकल्प केला व अवघ्या 25 दिवसांत ड्रोन तयार करून हवेत उडविला. या ड्रोनचे वजन 80 ग्रॅम असून बाराशे मीटर रेंजपर्यंत उडण्याची त्याची क्षमता आहे. रिमोट कंट्रोलद्वारे यावर नियंत्रण ठेवता येते. बाराशे मीटरच्या पुढे जर ड्रोन गेला, तर हातात असलेल्या रिमोटवर लाल सिग्नल असलेला लाइट त्याचे संकेत देतो, ज्यामुळे ड्रोन सुरक्षित रेंजमध्ये परत घेता येते. विश्‍वजितने केलेल्या या ड्रोनमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - बापरे! तब्बल ७० टक्के गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी; लाखनी, साकोलीसह लाखांदूर तालुके...

80 ग्रॅम वजन असलेला ड्रोन आणखी मोठा करून त्याला एक कॅमेरा बसवून त्यामधून चांगले फोटो व्हिडिओ शूट करता येणार आहेत. अभ्यासानंतर खाली वेळात मला जे सुचते त्याप्रमाणे मी नवीन काही बनविण्याचा प्रयत्न करतो. याआधी दोन ड्रोन व एक जेसीबी तयार केला होता.
-विश्‍वजित बायस्कर, मोझरी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student made drone from waste material in teosa of amravati