नर्सरीवर कब्जा करून निलडोहवासींचा रोकला जातोय श्‍वास

सोपान बेताल
Monday, 5 October 2020

निपानी सोनेगाव, निलडोह, डिगडोह, नागलवाडी, वानाडोंगरी या परिसरातील गुरेढोरे या कुरणात चरण्यासाठी येत असत. आजपर्यंत निलडोह येथील गुरेढोरे  येथे चरत होती, पण ही निलडोह गावाची नर्सरी एमआयडीसीने दुसऱ्या एका कंपनीला परस्पर विकली, असा जनता आरोप करीत आहे.

हिंगणा एमआयडी (जि.नागपूर): निलडोह गावाला लागून १९६० पूर्वीपासून एक कुरण होते. एमआयडीसीचा नकाशा बनल्यावर या जनावरांच्या चराईचे कुरणाची नोंद नर्सरीमध्ये झाली आणि एमआयडीसीकडे तिचे संवर्धन आले. निपानी सोनेगाव, निलडोह, डिगडोह, नागलवाडी, वानाडोंगरी या परिसरातील गुरेढोरे या कुरणात चरण्यासाठी येत असत. आजपर्यंत निलडोह येथील गुरेढोरे  येथे चरत होती, पण ही निलडोह गावाची नर्सरी एमआयडीसीने दुसऱ्या एका कंपनीला परस्पर विकली, असा जनता आरोप करीत आहे. गावकऱ्यांनी विरोध केला, पण एमआयडीसी ऑफिसच हाकर्स झोन बनल्याने ४ कंपन्याच्या हातात ही नर्सरी गेली. यावरून आजही गावकऱ्यांत अंसतोष खदखदत आहे.

अधिक वाचाः तलावात उडी घेऊन दोन सख्ख्या भावांनी दिले थेट मृत्यूला निमंत्रण
 

आरोग्याशी खेळण्याचा प्रकार
याच नर्सरीत दोन मोठ्या विहिरी आहेत . याच विहिरीतून निलडोह अमरनगर या गावाची नळयोजना सुरू आहे. पूर्ण गावाची तहान या विहीरीच भागवितात. या विहिरीमुळे नर्सरीचा काही भाग एमआयडीसी विकू शकली नाही. अन्यथा एमआयडीसीच्या नकाशावरुन गावाची नर्सरी कायमची मिटली असती. हे होत असताना ज्या कामासाठी एमआयडीसी कार्यालय झाले ते काम तिथे होताना दिसत नाही. एमआयडीसी परिसरात रस्त्याची दुर्दशा, कंपनीचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नाहीत. अजूनही कंपनीच्या गेटवर पथदीवे लागलेच नाही. रात्रीच्या अंधारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कधी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेच नसल्याची तक्रार व्यक्त केली. एकीकडे झाडे लावा, झाडे जगविण्याचा संकल्प केला जातो, तर दुसरीकडे एमआयडीसीतील प्रदुषण कमी करण्यासाठी नैसर्गिक असलेली नर्सरी विकल्या जाते. बाजूलाच जुने गाव निलडोह आहे. तेथील लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. याची चौकशी व्हावी. वेळ पडल्यास आम्हीही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा वानाडोंगरीतील नगरपरिषदेचे सत्तापक्ष नेते बाळू मोरे यांनी दिला.

एमआयडीसी विकास करण्यात ‘फेल’
हिंगणा टी पाईन्टपासून हा परिसर एमआयडीसीत येतो. पण ६०वर्षे झालीत, औद्योगिक परिसरासारखा विकास झालाच नाही. विकासाचा आराखडा एमआयडीसीने बनवलाच नाही. आज रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येतात. डिगडोह ते निको इंजिनिअरिंग हा आतील भाग असून आजही पथ दिव्यांची सोय नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्यामुळे अनेक कंपन्यात पाणी साचते. टाकाऊ कचऱ्याचे काय करायचे कुठे टाकायचे, हा मोठा प्रश्न असल्याची चिंता सामाजिक कार्यकर्ते बंटी भांगे यांनी व्यक्त केली.

अधिक वाचाः हिंगणा एमआयडीसीत चालते श्रमिकांच्या घामावर ठेकेदारांची सावकारी
 

वृक्षप्रेमींनी पुढे यावे
मी निलडोह येथील रहिवासी माझी ही शेती एमआयडीसीत गेली. आमचे गाई, जनावरे या नर्सरीत चरायची. एमआयडीसी बनण्यापूर्वी  हा भाग चराईचाच होता. या नर्सरीत एमआयडीसीने एक झाडही लावले नाही. आता ती विकली. कंपनी बाधकांम करित आहे. अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि सुरू असणारे प्रदूषण विभागाने आणि वृक्षप्रेमी संघटनांनी वृक्षकटाई होण्यापासून वाचवावे, असे आवाहन निलडोहचे माजी सरपंच अशोक घुगरे यांनी केले.

एमआयडीसीने गावकऱ्यांवर अन्याय केला
अगोदर कंपनीने मशनरी नर्सरीच्या मैदानात टाकल्या. हळूहळू रात्रीला मोठमोठी झाडे कापलीत. तेव्हा हा प्रकार लक्षात आला होता. ‘सकाळ’ ने दखल घेऊन बातमी प्रकाशित केली. एमआयडीसीकडे काम थांबविण्यासाठी निवेदनही दिले. पण कुणीच दखल घेतली नाही. आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. त्यासाठी ग्रामपंचायतकडे जागा नाही. या जागेची बाजारासाठी मागणी केली. बाजाराचे अर्ध उत्पन एमआयडीसीने घ्यावे आणि अर्धे उत्पन्न ग्रामपंचायतने, हा विचार समोर आला. तो एमआयडीसीने नाकारला. पण आज संपूर्ण नर्सरी विकली असल्याची हकीकत माजी उपसरपंच
राकेश दुबे यांनी व्यक्त केली.

अधिक वाचाः आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का?
 

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
नर्सरीच्या बाजूला जूनी लोकवस्ती असताना नर्सरी विकताच येत नाही. एमआयडीसीमध्ये ही झोन पडलेले आहेत. त्या मध्ये कमर्शियल झोन, नॉन कमर्शिअल झोन आणि नर्सरी ही आरक्षित आहे. एमआयडीसीमधील कारखान्यातून निघणारा धुळ आणि परिसरात पसरणारे प्रदूषण यावर निर्बंध करण्यासाठी नर्सरी उपयोगाची असते. कुठलेही भूखंड कुणालाही, कोणत्याही उद्योगाला विकता येत नाही. तशी परवानगी नियमानुसार घ्यावी लागते. ग्रामपंचायत निलडोहचा परिसर असताना जसा कारखाना खोलण्यासाठी ग्रामपंचायतची परवानगी लागते. मग नर्सरी विकताना ग्रामपंचायतला विचारले का? म्हणून चौकशी व्हावी आणि कायदेशीर लढाई आम्ही लढणार.
आदर्श पटले
जिल्हाध्यक्ष
भाजप युवा मोर्चा नागपूर जिल्हा, राजीवनगर, हिंगणा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Occupying the nursery, the breathing of Nildoh residents is stopped