‘संजय गांधी’ची नियुक्तीच नाही; अनुदानाच्या प्रतीक्षेत कढोली येथील वृद्धेचा मृत्यू

सतीश दहाट
Tuesday, 13 October 2020

महसूल विभागाच्या अखत्यारीतील या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन योजना समितीकडून केली जाते. या समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ता व पदसिद्ध सचिव तहसीलदार असतात. या समितीची निवड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी करतात.

कामठी (जि. नागपूर) : समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध अर्थसहाय्य योजना चालविले जातात. परंतु, यासाठी लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन समितीची वर्षभरापासून नियुक्तीच झालेली नाही. यामुळे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. अनुदानाअभावी वेळेवर उपचार होऊ न शकल्याने कढोली येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

६५ वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना तसेच विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना चालविली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रतीमहा अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होते. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वर्ष वयोगटातील कमावत्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना चालविली जाते. या कुटुंबास २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.

सविस्तर वाचा - हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप

महसूल विभागाच्या अखत्यारीतील या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन योजना समितीकडून केली जाते. या समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ता व पदसिद्ध सचिव तहसीलदार असतात. या समितीची निवड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी करतात. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे युती शासनाने नेमलेली समिती बरखास्त झाली.

तातडीने उपाय योजनेची गरज
समिती अस्तित्वात नसेल तर या योजनांसाठी लाभार्थी निवडीचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. पण मार्च २०२० पासून कोविड-१९ चा प्रकोप सुरू झाल्याने प्रशासन कोरोनात व्यस्त आहे. संजय गांधी स्वावलंबन समिती अस्तित्वात नाही, याची जाणीव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही संजय गांधी स्वावलंबन समिती निवडीबाबत कसलेही प्रयत्न होताना दिसत नाही. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात या योजनांच्या हजारो लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. अनुदानाअभावी वेळेवर उपचार होऊ न शकल्याने कढोली येथील रुखमा पंजाबराव निकाळजे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. यावर तातडीने उपाय योजनेची गरज आहे.
- प्रांजल वाघ,
सरपंच, कढोली

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An old Woman from Kadholi died while waiting for a grant