हत्याकांडातील एका आरोपीला अटक; मंगळवारीतील चहा विक्रेत्याचे खून प्रकरण

अनिल कांबळे
Thursday, 14 January 2021

आरोपींनी त्यांच्या जागेवर कब्जा केला. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने त्या जागेवर भाजीचे दुकान लावले. यावरून अक्षय आणि आरोपींमध्ये भांडण झाले. आरोपींनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अक्षयवर हल्ला केला.

नागपूर : सदरमधील मंगळवारी बाजारामध्ये चहा विक्रेत्याच्या हत्याकांडात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य चार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. राजू मोहनलाल वर्मा (५२, रा. चिंतामणीनगर, जुना कामठी रोड) असे अटकेतील आरोपीचे आहे. पोलिसांनी राजूला बुधवारी न्यायालयात हजर केले असता १९ जानेवारीपर्यंत (सोमवार) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

या हत्याकांडात राजूसह प्रेमनगर निवासी साहिल राजू वर्मा, विक्की वर्मा, निखिल वर्मा आणि त्याच्या साळ्याचा समावेश आहे. मृत अक्षय ऊर्फ गोलू निर्मळे याच्याविरुद्धही ठाण्यात गुन्हे नोंद होते. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटला होता. अक्षय आणि त्याची होणारी पत्नी पल्लवी यांनी मंगळवारी बाजारात बंडू नावाच्या व्यक्तीकडून त्याची जागा खरेदी केली होती. तेथे दोघेही मिळून चहा-नाश्त्याची दुकान चालवत होते.

अधिक वाचा - जुळलेलं लग्न तुटलं अन् त्याच्या डोक्यात घुसला राक्षस; मुलगी आणि आईसोबत केलं धक्कादायक कृत्य

आरोपींनी त्यांच्या जागेवर कब्जा केला. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने त्या जागेवर भाजीचे दुकान लावले. यावरून अक्षय आणि आरोपींमध्ये भांडण झाले. आरोपींनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अक्षयवर हल्ला केला. चाकू आणि तलवारीने त्याच्यावर अनेक वार करण्यात आले. त्यावेळी अक्षयचा भाऊ गौरव आणि पल्लवीने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी त्या दोघांवरही शस्त्राने हल्ला केला आणि फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी राजूला अटक केली आहे. चार आरोपींचा शोध सुरू आहे. सदर पोलिस गस्तीबाबत गंभीर नसल्यामुळे या परिसरातील गुन्हेगारी वाढली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One of the accused in Tuesdays murder has been arrested Nagpur murder news