जुळलेलं लग्न तुटलं अन् त्याच्या डोक्यात घुसला राक्षस; मुलगी आणि आईसोबत केलं धक्कादायक कृत्य 

श्रीकांत पशेट्टीवार 
Wednesday, 13 January 2021

मुलाची वर्तवणूक चांगली नाही,अशी माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे त्या दोघांचं लग्न मोडलं होतं.

चंद्रपूर : मुलाची वर्तणूक चांगली नाही म्हणून मुलींच्या कुटुंबीयांनी जुळलेले लग्न तोडले. आणि मग काय भडकलेल्या मुलानं धक्कादायक पाऊल उचललं. 

घटना नागभीड तालुक्‍यातील बहार्णी येथे घडली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने नाकाबंदी करून मध्यप्रेदश सीमेवरून आरोपींना अटक करुन युवतीसह आईची सुटका केली बहार्णी येथील मुलीचे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यातील रुयाळ येथील रामकृष्ण भोयर या युवकाशी लग्न जुळले होते. काही दिवसांपूर्वी साक्षगंधही झाले होते. मात्र, मुलाची वर्तवणूक चांगली नाही,अशी माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे त्या दोघांचं लग्न मोडलं होतं.

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

मुलीच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुलाचा राग अनावर झाला. त्याने मुलीना पळवून नेण्याचा डाव रचला. पाच मित्रासह मुलीच्या अपहरणाचा बेत आखला. मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास रामकृष्ण भोयर व त्याचे मित्र वाहनासह मुलीच्या गावात दाखल झाले. रामकृष्ण आणि त्याच्या एका मित्राने मुलीच्या घरात प्रवेश करून बळजबरीने उचलून गाडीत टाकले. 

दरम्यान, तिच्या आईने आरडाओरड सुरू करताच तिलाही आरोपीने बळजबरीने उचलून गाडीत टाकून गावातून पळ काढला. कान्पा येथे आरोपीने दुसरे वाहन उभे करून ठेवले होते. या वाहनातून रामकृष्ण हा युवती आणि तिच्या आईला घेऊन मध्यप्रदेशच्या दिशेने पसार झाला. तर अन्य आरोपी दुसऱ्या वाहनातून पसार झाले. 

मुलीच्या अपहरणाची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळताच त्यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच नागपूर ग्रामीण पोलिसांना माहिती देत चंद्रपूसह नागपूर जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली. केळवद पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपीचे वाहन अडविले. आरोपी रामकृष्ण भोयरसह त्याचे अन्य दोन मित्रांना अटक करून युवती आणि तिच्या आईची सुटका करण्यात आली.

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

नागभीड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहरणासाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. रामकृष्ण भोयरसह शुभम गोडबोले, शेषराज गडेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपी पसार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली. पुढील तपासासाठी प्रकरण नागभीड पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man misbehaved with girl and her mother in Chandrapur