खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

समाजसेवेचा वसा येथील अनेक तरुण जपत आहेत. शिवाय, काही सामाजिक कार्यकर्तेही कायम आपल्यातील माणूसपण जागे ठेवून मदतीसाठी पुढाकार घेतात. असाच प्रसंग कालपरवा घडला.

यवतमाळ : "थोडा है, थोडेकी जरुरत हैं,' जीवन जगताना अशी सामान्य माणसांची अवस्था असते. मात्र, तुमच्याजवळ जे काही थोडसं आहे; त्यातूनही थोडं कुणाला देऊन परमानंद मिळवता आला तर...याचा विचार फारच थोडे लोक करतात. जे करतात त्यांच्या हातून मात्र ईश्‍वरीय कार्यच घडत असते.
यवतमाळात गरजू, निराधार लोकांना, रस्त्यांवर भटकणाऱ्या मानसिक रुग्णांनाही मदत करणाऱ्या काही संस्था, समाजसेवक कार्यरत आहेत. त्यामुळे समाजसेवेचा वसा येथील अनेक तरुण जपत आहेत. शिवाय, काही सामाजिक कार्यकर्तेही कायम आपल्यातील माणूसपण जागे ठेवून मदतीसाठी पुढाकार घेतात. असाच प्रसंग कालपरवा घडला. माजी नगरसेवक अमन निर्बाण मॉर्निंगवॉकसाठी गोधनी मार्गाने जात होते. एक सात-आठ वर्षांचा चिमुकला त्यांना कुडकुडत्या थंडीत अनवाणी पायाने शाळेत जाताना दिसला. पाठीवर दप्तराचे ओझे असलेल्या त्या विद्यार्थ्याला त्यांनी गाठले. त्याचे नाव विचारले. आशुतोष टेकाम, असे त्याचे नाव. तो गोधनी येथे राहतो. वडील ट्रकचालक आहे. आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती गरिबीची आहे. तो रोज गोधनीवरून यवतमाळला पाच किलोमीटर पायी शाळेत येतो. पायात चप्पल का नाही, याकडे त्याचे लक्ष वेधले. तेव्हा त्याने पंधरा दिवसांपासून चप्पल तुटल्याचे सांगितले. तो चिमुकला अनवाणी पायानेच शाळेत जात आहे, हे पाहून अमन निर्बाण यांचे मन द्रवले. त्यांच्यातील माणूस जागा झाला. त्यांनी त्याला दत्त चौकातील दुकानात नेले आणि बूट घेऊन दिले. नंतर त्या मुलाने पुस्तके पण नाहीत असे सांगितले. त्याला पुस्तकांच्या दुकानात नेऊन पुस्तकेही विकत घेऊन दिलीत. त्यानंतर शाळेत नेऊन सोडले. शाळेच्या गेटमधून प्रवेश करताना त्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. समाधानाचे भाव उमटले. त्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद परमानंद देऊन गेल्याचे निर्बान सांगतात.
गरजुंना मदत हिच खरी मानवता
'गरजू व्यक्तीला मदत करणे हीच खरी मानवता आहे. तोच ईश्‍वरी धर्म आहे. तीच खरी भक्ती आहे. यातून मिळणारा आनंद हा अलौकिक असतो.'
अमन निर्बाण, सामाजिक कार्यकर्ता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One day angle came in his life &...