खुशखबर, नागपुरातील कोरोनाचा रुग्ण झाला ठणठणीत, आईने दृष्ट काढून केले स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी पोहचला असतानाच शहरात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला, यामुळे एकच खळबळ उडाली. हे 43 वर्षीय गृहस्थ व्यवसायानिमित्त दिल्ली येथे गेले होते. 18 मार्च रोजी ते नागपुरात परत आले. यानंतर त्यांचा नागपुरात वावर आहे. बुधवारी त्यांना कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली. यामुळे मेयोत ते स्क्रिनिंगसाठी आले. दरम्यान ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे.

नागपूर : कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी पोहचला असतानाच शहरात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला, यामुळे एकच खळबळ उडाली. हे 43 वर्षीय गृहस्थ व्यवसायानिमित्त दिल्ली येथे गेले होते. 18 मार्च रोजी ते नागपुरात परत आले. यानंतर त्यांचा नागपुरात वावर आहे. बुधवारी त्यांना कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली. यामुळे मेयोत ते स्क्रिनिंगसाठी आले. दरम्यान ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यांना तत्काळ मेयोत दाखल करण्यात आले. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 वर पोहचली आहे.

खामला येथील त्या व्यक्तीचे नमुने कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष असे की, कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तींच्या पुर्वी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांनी मेयोत तपासणी केली. त्यांचे नमुने निगेटिव्ह आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाबाधित व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ती व्यक्ती 18 मार्च रोजी घरी परतल्यानंतर सुरूवातीला चार दिवस त्यांची प्रकृती ठिक होती. मंगळवारपासून त्यांना ताप, खोकला, सर्दी तसेच अंगदुखीचा त्रास होत असल्याने त्यांनी मेयो गाठले. बुधवारी संबधित व्यक्तींच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचा अहवाल गुरूवारी प्राप्त झाला. कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढल्यामुळे सर्वांनाच धास्ती बसली आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध

दिल्ली ते नागपूर असा रेल्वेतून प्रवास करून ते नागपूरात दाखल झाले. गेल्या आठवड्यापासून नागपुरातच आहेत. सुरूवातीला त्यांनी आपल्या दुकानातही काम केले. याशिवाय गेल्या आठ दिवसांपासून ते नागपुरातील विविध भागात फिरत आहेत. यामुळे अनेकांच्या संपर्कात ते आले असतील. यामुळे आता आरोग्य यंत्रणेसमोरचे आव्हान वाढले आहे. मात्र सतर्क असलेल्या आरोग्य यंत्रणेकडून संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेत शोधमोहिम सुरू आहे.

पहिला कोरोनाबाधित रुग्ण घरी परतला
कोरोनाने थैमान घातलं असताना दिलासादायक बाब अशी की, उपराजधानीत 11 मार्च रोजी आढळून आलेला पहिला कोरोना विषाणूबाधित रुग्ण गुरूवारी कोरोना मुक्त झाला. मेयो रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. कोरोनासोबत युद्ध करुन ते विजयी झाल्याचे समाधान यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. वॉर्डातून निघत असताना त्यांनी उपचार करणाऱ्या मेयोतील डॉक्‍टरांचे आभार मानले, हे विशेष. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्यासह अनेक अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

अमेरिकेतून सहा मार्च रोजी नागपुरात परतल्यानंतर त्यांचे मेयो रुग्णालयात नमुने तपासण्यात आले. या तपासणीत कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या उपकेंद्राद्वारे (मेयो) दिला. तेव्हापासून त्यांच्यावर मेयोत उपचार सुरू होते. त्या दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेकडून शहरातील आरोग्य सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात आला. कोरोना संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षापासून तर उपचार यंत्रणेची व्याप्ती वाढवण्यात आली. मेडिकल, मेयोत स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात आहे.

सविस्तर वाचा - अकरा विदेशींना ठेवले होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात

डॉक्‍टरांना मिळाले बळ

पहिलाच कोरोनाबाधित व्यक्ती उपचारातून बरा झाल्यामुळे मेयोतील डॉक्‍टरांना बळ मिळाले. जगभरात कोरोनामुळे हजारो व्यक्तींचा जीव गेला, परंतु उपराजधानीत पहिल्या कोरोनाग्रस्ताला मुक्त करण्याचे आव्हान मेयोतील डॉक्‍टरांनी लिलया पेलले. 11 मार्च रोजी कोरोनाबाधित व्यक्ती असल्याचे आढळून आल्यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांवर एकप्रकारचे दडपण होते. मात्र 24 तास मेयोतील पथकाकडून त्यांच्यावर उपचार झाले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One more corona positive in Nagpur