आणखी एक कोरोनाबाधित? बाधितांची संख्या 18!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

हा रुग्ण इंडोनेशियातून दिल्लीमार्गे नागपूरला परतला. मेडिकलमध्ये तपासणीसाठी आला होता. येथे त्याचे नमुने घेतल्यावर त्याला आमदार निवासातील विलगीकरणात ठेवले गेले. त्याचे नमुने सहा एप्रिल रोजी तपासले असता, त्याला कोरोनाची बाधा असल्याचे पुढे आले. ही माहिती प्रशासनाला कळताच तातडीने त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवून त्याच्या संपर्कातील  व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.

नागपूर  : दिल्ली ते नागपूर प्रवास करून आल्यानंतर आमदार निवास विलगीकरणातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल सोमवारी (ता.6) आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला आला. एम्सच्या प्रयोगशाळेत आज 53 नमुने तपासण्यात आले असून, चंद्रपुरातील 39 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आहे. चार दिवसांपासून तो विलगीकरणात होता. त्याला तातडीने उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवले. कोरोनाबाधितांची संख्या आता 18 वर पोहचली आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (एम्स)च्या विषाणू प्रयोगशाळेतील तपासणी अहवालातून हे समोर आले आहे. हा रुग्ण इंडोनेशियातून दिल्लीमार्गे नागपूरला परतला. मेडिकलमध्ये तपासणीसाठी आला होता. येथे त्याचे नमुने घेतल्यावर त्याला आमदार निवासातील विलगीकरणात ठेवले गेले. त्याचे नमुने सहा एप्रिल रोजी तपासले असता, त्याला कोरोनाची बाधा असल्याचे पुढे आले. ही माहिती प्रशासनाला कळताच तातडीने त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवून त्याच्या संपर्कातील  व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना मेडिकल, मेयो तसेच चंद्रपूर येथील मेडिकलमध्ये हलवून त्यांची तपासणी केली जाणार आहे.
...
मध्य नागपुरातील ते कुटुंबीय निगेटिव्ह
मध्य नागपुरातील 32 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नमुन्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा आला. यात त्या व्यक्तीची पत्नी, पाच मुले, दोन भाचे अशा जवळच्या आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या कुटुंबातील व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्याचा अंदाज डॉक्‍टरांकडून वर्तवला गेला. परंतु खबरदारी म्हणून 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल.

शहरात आज 100 चाचण्या
एम्समध्ये सोमवारी 56 नमुने तपासण्यात आले. यात एक कोरोनाबाधित आढळला. तर मेयो रुग्णालयात दुरुस्त झालेल्या यंत्रावर 30 नमुने तपासण्यात आले. आज पहिल्यांदाच माय लॅबच्या किटद्वारे नमुने तपासण्याची चाचणी करण्यात आली.

सविस्तर वाचा~ उपराजधानीत कोरोनाचा पहिला बळी

वैद्यकीय शिक्षण विभागाने केली कामाची वाटणी
उपराजधानीत "मेयो' आणि "एम्स' येथे कोरोना विषाणूंचे नमुने तपासणीची सोय आहे. नमुने तपासणीच्या कामाचा व्याप बघता सध्या मेयोवर भार आहे. यामुळे पुढील काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोरोना तपासणीबाबतची विभागणी केली आहे. विदर्भातील 6 जिल्ह्यातील नमुने तपासणीचा भार "मेयो'तील प्रयोगशाळेवर आहे. तर "एम्स'मध्ये 5 जिल्ह्यातील नमुने तपासण्यात येतील. मेयोकडे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने तपासण्यात येतील. तर "एम्स'मध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येइृल. मेयोतील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे आणि वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सोमवारी एम्समधील तज्ज्ञांना एका सायकलमध्ये सुमारे 30 ते 33 नमुने तपासण्याबाबतचे तंत्र सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One more corona positive in Vidarbha