esakal | मॉर्निंग वॉकला गेल्या चार महिला, पण कारनं धडक दिली अन् सर्वच संपलं
sakal

बोलून बातमी शोधा

woman died and two are injured in car accident in nagpur

अचानक बोलेरोचे चाक निघाले. यात बोलोरोचे संतुलन बिघडून पायदळ जाणाऱ्या महिलेला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चाकाखाली आल्यामुळे महिलेचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.

मॉर्निंग वॉकला गेल्या चार महिला, पण कारनं धडक दिली अन् सर्वच संपलं

sakal_logo
By
विजयकुमार राऊत

खापरखेडा (जि. नागपूर) : बिनासंगम रोडवरील अश्विनी शाळेजवळ नॅशनल ब्रिक्ससमोर दोन वाहनांत झालेल्या विचित्र अपघातात मॉर्निंग वाकला जाणाऱ्या महिलेला बोलोरोने उडविले. ही घटना मंगळवारी सकाळी ५:४५च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. 

हेही वाचा - चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला, संसाराच्या वेलीवर फुल उमलले; पण बापच निघाला...

प्राप्त माहितीनुसार, गोदावरी नामदेव भुरे(वय४८, बिनासंगम), असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे, तर ललिता ज्ञानेश्वर जांगळे (वय५३) व करूणा चांगदेव जांगळे (वय ४५, बिनासंगम) असे गंभीर जखमींची नावे आहेत. सोबतच्या चौथ्या महिलेचे नाव अश्विनी कैलास बेलपांडे (वय३८, बिनासंगम)असे आहे. या घटनेतील बिनासंगम येथे राहणाऱ्या चारही महिला सकाळच्या सुमारास 'मार्निंग वॉक'साठी मुख्य मार्गाने बिनजोडकडे निघाल्या होत्या. दरम्यान, शाळेजवळ नॅशनल ब्रिक्स कंपनीसमोर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक व बोलेरो वाहनाचा विचित्र अपघात घडला.

हेही वाचा - जंगलात जनावरे चराईसाठी गेला आणि समोरचे दृष्य पाहून...

कोळशाचा खाली ट्रक व वाळूवाहतूक करणारी बोलोरो ही दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात असताना भरधाव ट्रकची बोलोरोला 'कट' लागली. अचानक बोलेरोचे चाक निघाले. यात बोलोरोचे संतुलन बिघडून पायदळ जाणाऱ्या महिलेला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चाकाखाली आल्यामुळे महिलेचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. मृत महिलेसोबत असणाऱ्या इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना लागलीच कामठी येथे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. त्यातील एक महिला गंभीर आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक भटकर, एपीआय मलकुलवार, पीएसआय निमगडे, खापरखेडा वाहतूक पोलिस कैलास पवार आदींनी घटनास्थळ गाठून जमाव पांगवित वाहतूक सुरळीत केली. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालय कामठी येथे हलविला. घटनेतील बोलोरोचालक राजू भुर्रे (बिनासंगम) व ट्रकचालक रोहित झोराडे (वय२४, छिंदवाडा मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून खापरखेडा पोलिस निरीक्षक भटकर, चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती मलकुलवार घटनेचा पुढील तपास करीत आहेत.