धम्मक्रांतीला ऑनलाइन अभिवादन, दीक्षाभूमी शांत 

केवल जीवनतारे
Wednesday, 14 October 2020

दीक्षाभूमीवर पंचशील झेंडे वाऱ्याच्या झुळूक येताच लहरत होते, मात्र दीक्षाभूमी गर्दीशिवाय शांत होती. चहूबाजूंच्या प्रवेशद्वार बंद करण्यात आले. खाकी वर्दीतील पोलिस तैनात होते. बाबासाहेबांची जयंती असो की, बुद्ध जयंतीला लॉकडाउन होते.

नागपूर : दीक्षाभूमीने आंबेडकरी समाजाला भयमुक्‍त आणि बंधमुक्‍त केले. मात्र कोरोनामुळे ६४ वर्षांनंतर प्रथमच दीक्षाभूमीला बंदिस्त करून ठेवण्यात आले. कोणत्याही संकटाशी टक्कर घेऊ शकणाऱ्या समाजाला कोरोनामुळे दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करता आले नाही. दुरूनच दोन्ही हात जोडून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करताना खांद्यावरील पंचशील झेंडा सावरत दीक्षाभूमीच्या क्रांतीचे ‘तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी‘ हे उदयगीत गात आल्या पावली परत जात होता.

दीक्षाभूमीवर पंचशील झेंडे वाऱ्याच्या झुळूक येताच लहरत होते, मात्र दीक्षाभूमी गर्दीशिवाय शांत होती. चहूबाजूंच्या प्रवेशद्वार बंद करण्यात आले. खाकी वर्दीतील पोलिस तैनात होते. बाबासाहेबांची जयंती असो की, बुद्ध जयंतीला लॉकडाउन होते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर १४ऑक्टोबर आणि अशोक विजयादशमीला येतात. 

ठळक बातमी - जीवनसाथी गमावलेल्यांच्या कोरोनामध्येही जुळल्या मनाच्या तारा
 

मात्र, कोरोनामुळे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यावर्षी स्मारक समितीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. हजारो भीमसैनिकांनी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन अभिवादन केले. दीक्षाभूमीसह संविधान चौकातही बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाताना अतिशय अडचणींचा सामना करावा लागला. येथे पोलिसांनी कठडे लावून ठेवले. यामुळे संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत सामान्य अनुयायांना पोहोचता आले नाही.

सोशल मीडियावरून उजाळा

मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी समाजमाध्यमातून धम्मक्रांतीला अभिवादन केले. फेसबुक पासून तर व्हॉटस् ॲपवरून शुभेच्छा देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला. मागील ६३ वर्षे शुभ्र वस्त्र परिधान करून खांद्यांवर पंचशील ध्वज घेतलेला बौद्ध बांधव मिरवणुकीने येत दीक्षाभूमीवर गर्दी करतो. दीक्षाभूमी परिसर फुलून गेला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर हजेरी लावताच आली नाही. यामुळे धम्मगीतांपासून तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या आठवणींना सोशल मीडियावरून उजाळा देण्यात आला.

पुस्तकांचे स्टॉल तुरळक 

डॉ. आंबेडकर यांचे वैचारिक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गीतांच्या सीडीपासून तर पुस्तकांचे स्टॉलची दरवर्षी दीक्षाभूमीवर गर्दी असते. यंदा मात्र दीक्षाभूमीच्या रस्त्यावर एकही पुस्तकाचे दुकान दिसले नाही. आरोग्य विभागाजवळ चार दोन स्टॉल दिसले. तर संविधान चौकात विद्यानंद निमसरकार यांचे एकच पुस्तकांचे दुकान होते.

गीतांची मैफलही नाही

दीक्षाभूमीवर दरवर्षी बोधीवृक्षाखाली तसेच दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारावर भीम आणि बुद्ध गीतांची मैफल सुरू असते. उपस्थित प्रत्येक जण क्रांतीचे उदयगीत दीक्षाभूमीवर गात असतो. मात्र, यावर्षी कोरोनमुळे भीमबुद्ध गीतांची मैफल सजली नाही. 

आंबेडकरी जनतेला मानाचा जयभीम
१४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याचा वर्धापन दिन. या क्रांतीचा सोहळा आंबेडकरी समाजाच्या नजरेत साठवला आहे. यामुळेच ६४ वर्षांपासून दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी समाज संघटीतरित्या येतो. मात्र कोरोनाच्या या महामारीमुळे हा सोहळा रद्द करण्याची सूचना करण्यात आली. यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने उपासकांना दीक्षाभूमीवर गर्दी करू नये अशी विनंती केली. विनंतीला मान देऊन, आपल्या घरातूनच बाबासाहेबांना मानवंदना दिली. आंबेडकरी जनतेला मानाचा जयभीम.
-सुधीर फुलझेले, सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, नागपूर 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online greetings to Deekshabhoomi