नागपूर जिल्ह्यात केवळ १२३४ कोरोनाबाधित; २४ तासांत सात मृत्यू ः १९२ नवीन रुग्णांची भर

केवल जीवनतारे 
Sunday, 1 November 2020

घरीच विलगीकरणात २ हजार ६९६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ७ जण दगावले असून, यातील २ शहरातील, दोन ग्रामीण भागातील तर ३ जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या ३ हजार ४१० झाली

नागपूर ः कोरोनाबाधितांच्या संख्येत बरीच घट झाली असून, रविवारी (ता.१) १९२ रुग्णांची भर पडली. यात शहरात १३३ तर व ग्रामीण भागात ५६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मेयो, मेडिकल, एम्ससह १०४ कोविड हॉस्पिटलमध्ये अवघे १ हजार २३४ रुग्ण भरती असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

घरीच विलगीकरणात २ हजार ६९६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ७ जण दगावले असून, यातील २ शहरातील, दोन ग्रामीण भागातील तर ३ जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या ३ हजार ४१० झाली. तर कोरोना बाधितांचा आकडा १ लाख २ हजार ९७८ वर पोहचला.

नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

जिल्ह्यातील आठ कोरोना चाचणी प्रयोगशाळांमध्ये रविवारी चाचण्यांची संख्या रोडावली. पूर्वी सात हजारांवर चाचण्या होत असत, अलीकडे हा आकडा पाच हजारांवर आला. मात्र १ नोव्हेंबरला जिल्ह्यात २ हजार ७०८ चाचण्या झाल्या. यामुळेच कोरोनाबाधितांचा आकड्यामध्ये घट दिसून येत असल्याची चर्चा होती. आतापर्यंत ६ लाख ३५ हजार ७४२ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी १ लाख २ हजार ९७८ रुग्ण आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत ७४३ कोरोना चाचण्या झाल्या असून, यापैकी केवळ २० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

मेयो रुग्णालयात ५२४ चाचण्या झाल्या. यापैकी ५५ जण बाधित आढळले. एम्समध्ये ६६ चाचण्या झाल्या असून, यातील सात जणांना बाधा झाली. मेडिकलमध्ये ४०७ चाचण्यांपैकी ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला. जिल्ह्यातील २ हजार ७०८ चाचण्यांपैकी २ हजार ५१६ जण कोरोना निगेटिव्ह आढळले. स्थानिक प्रशासनाने दिलासादायक चित्र असल्याची भावना व्यक्त केली. मात्र वैद्यक तज्ज्ञांमध्ये रुग्णालयापर्यंत रुग्ण पोहचत नसल्याची चर्चा केली. यामुळे दुसऱ्या लाटेची भीतीही व्यक्त होत आहे.

हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

५१२ जणांची मात

ऑक्टोंबर महिन्यात ३१ दिवस सातत्याने कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक होती. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशीही हेच चित्र आकडेवारीवरून पुढे आले. १९२ कोरोनाबाधित आढळून आले. तर एकाच दिवशी ५१२ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ९५ हजार ६३८ झाली. यातील ७६ हजार ३४५ बरे होणारे रुग्ण शहरातील आहेत. तर १९ हजार २९३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 1234 corona patients are in nagpur now