नागपुरात प्लाझ्मा थेरपी ट्रायलबाबत उदासीनता, ६२ हजार कोरोनामुक्तांपैकी ५० जणांनी केले प्लाझ्मा दान

केवल जीवनतारे
Thursday, 1 October 2020

सध्याच्या स्थितीत मेडिकलशी संलग्न रक्तपेढीकडे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या २९ जणांनी प्लाझ्मा दान केले. त्यातून ५८ प्लाझ्मा युनिट प्राप्त झाले. यातील ४७ प्लाझ्मा युनिट कोरोनाबाधितांना संक्रमित करण्यात आले. मेडिकलच्या रक्तपेढीकडे आता जेमतेम १० प्लाझ्मा युनिट शिल्लक आहेत.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ६२ हजार कोरोनामुक्त झाले असताना मेयो मेडिकलमध्ये अवघ्या ५० जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. ही उदासीनता दूर करण्यासाठी कोणताही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. विशेष असे की, दानात मिळालेल्या प्लझ्माचा उपयोग मेडिकल आणि मेयो झाला असल्याची माहिती आहे. मेडिकलमध्ये केवळ १० तर मेयोत १२ पिशव्या प्लाझ्मा शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे. 

कोरोनाची बाधा होऊन उपचाराने बरे झालेल्यांच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढणाऱ्या सैनिक पेशी बाधा झाल्यानंतर २८ दिवसांच्या कालावधीत विकसित होतात. वैद्यकीय परिभाषेत याला आयजीजी अँटिबॉडीज म्हणतात. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातील हाच घटक म्हणजे कनव्हल्संट प्लाझ्मा. हा प्लाझ्मा आजारी रुग्णाला संक्रमित केल्यास त्याची विषाणूशी झुंजण्यास मदत होते. प्लॅटिना ट्रायलमध्ये, राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालयं आणि मुंबईतील पालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात नागपूरच्या मेडिकलवर या ट्रॉयलची जबाबदारी देण्यात आली. नागपूर जिल्ह्यात ६२ हजारांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली. त्यांचे शरीर कोरोनामुक्त झाले. त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारशक्ती (आयजीजी अँटिबॉडीज) तयार झाली. त्यांच्या शरीरातील प्लाझ्मा गंभीर कोरोनाबाधितांना दिल्यास ते बरे होऊ शकतात, हे संशोधनातून सिद्ध झाले. त्यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्लाझ्मा थेरपीचा प्रकल्पाला गती दिली. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्लाझ्मा दात्यासाठी २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केल्यानंतरही याकडे कोरोनामुक्त रुग्णांनी पाठ फिरवली आहे. 

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविलयात दयनीय अवस्था, १० तंत्रज्ञ सांभाळतात १२ पोर्टेबल एक्स-रे मशीन

रक्तदानाचा आदर्श -
कोरोनाच्या संकट काळाताही मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तदानाचा टक्का मात्र कमी होऊ दिला नाही. लॉकडाउनच्या काळ असतानाही मेडिकलमध्ये ८ तर सुपर स्पेशालिटीत २ हजार २०० रक्त युनिट गोळा करण्यात मेडिकल-सुपरच्या विकृती विभागाला यश आले आहे. यासाठी मेडिकलचे विभागप्रमुख डॉ. दिनकर कुंभलकर, सुपरचे विकृतीविभागप्रमूख डॉ. संजय पराते, डॉ. भुषण महाजन, सामाजिक अधीक्षक किशोर धर्माळे यांच्यासह या विभागातील बीटीओपासून तर परिचारिकांनी विशेष परिश्रम घेतले. 

हेही वाचा - पुंजी खर्ची घालून साकारले स्वप्नांचे घर; शांततेच्या शोधात सोडला शहराचा मध्यवर्ती भाग, मात्र नशीब...

सध्याच्या स्थितीत मेडिकलशी संलग्न रक्तपेढीकडे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या २९ जणांनी प्लाझ्मा दान केले. त्यातून ५८ प्लाझ्मा युनिट प्राप्त झाले. यातील ४७ प्लाझ्मा युनिट कोरोनाबाधितांना संक्रमित करण्यात आले. मेडिकलच्या रक्तपेढीकडे आता जेमतेम १० प्लाझ्मा युनिट शिल्लक आहेत. मेयोच्या रक्तपेढीजवळ आतापर्यंत २० प्लाझ्मा युनिट संकलित करण्यात आले. त्यातील ५ युनिट रुग्णाला संक्रमित झाले. तर १२ युनिट प्लाझ्मा मेयोच्या रक्तपेढीकडे शिल्लक आहे. 

मेडिकल-सूपरचे आवाहन - 
प्लाझ्मा दानाचा टक्का अल्प आहे. प्लाझ्मा थेरेपी हा कोरोनावर ठोस उपचार नसला तरी हा प्रयोग आहे. आतापर्यंत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. प्लाझ्मा थेरेपी ट्रायलचा आधार घेऊन उपचाराची दिशा ठरविणे शक्य आहे. कोरोनामुक्त झालेल्या ९० टक्के व्यक्तींना लक्षणे नाहीत. त्यामुळे हे रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतात. त्यामुळे प्रशासनासोबतच कोरोनामुक्त झालेल्यांनी संवेदनशीलपणे प्लाझ्मादानासाठी पुढे यावे, असे आवाहन मेडिकल, मेयो प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 50 corona free people donated plasma out of 62 thousand in nagpur