पुंजी खर्ची घालून साकारले स्वप्नांचे घर; शांततेच्या शोधात सोडला शहराचा मध्यवर्ती भाग, मात्र नशीब काही बदलले नाही

योगेश बरवड
Thursday, 1 October 2020

मोठमोठ्या खड्डेपूर्ण रस्त्यांमुळे घरापर्यंत पोहोचण्याची वाट बिकट आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते. यामुळे डास व कीटकांचा त्रास असह्य झाला आहे. यामुळे रोग बळावण्याचा धोकाही वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर पाणी साचते. तेच विहिरी आणी बोअरवेलमध्ये झिरपते. परिणामी परिसरातील भूमिगत पाणी प्रदूषित झाले आहे.

नागपूर : नागरी सुविधांसह सुखकर जीवन व्यतित करता यावे, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु, गिरीबालाजीनगर आणि कुकडे ले-आऊट परिसरातील रहिवाशांसाठी ही अपेक्षा दिवास्वप्नच ठरली आहे. नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन कारवा लागत आहे.

शहराच्या सीमेवर असणाऱ्या या वसाहतीत प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची घरे आहेत. निवृत्तीनंतरच्या लाभातून स्वप्नांचे घर साकारले. पुंजी खर्ची घातली. उर्वरित आयुष्य शांतपणे घालविता येईल, अशी अपेक्षा होती. पण, मोठा काळ लोटूनही नागरी सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

शांततेच्या शोधात शहराचा मध्यवर्ती भाग सोडून येथे आलो. त्यावेळी सोसायटीकडून अनेक सुविधांची माहिती दिली होती. लवकरच विकास होणार असल्याचे स्वप्नही दाखविले. आता मात्र प्रचंड गैरसोईंचा सामना करावा लागत असून, फसगत झाल्याचे वाटू लागल्याचे नागरिक सांगतात.

मोठमोठ्या खड्डेपूर्ण रस्त्यांमुळे घरापर्यंत पोहोचण्याची वाट बिकट आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते. यामुळे डास व कीटकांचा त्रास असह्य झाला आहे. यामुळे रोग बळावण्याचा धोकाही वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर पाणी साचते. तेच विहिरी आणी बोअरवेलमध्ये झिरपते. परिणामी परिसरातील भूमिगत पाणी प्रदूषित झाले आहे.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

त्याच पाण्याचा दिनचर्येसाठी उपयोग करावा लागतो. विशेष म्हणजे गडरलाईन नसल्याने घरोघरी सेफ्टी टॅंक आहेत. त्यामुळे जलस्रोत दूषित झाले आहेत. ठिकठिकाणी झुडपे वाढली आहेत. अनेक निरुपयोगी वेली तर घराच्या छतापर्यंत पोहोचल्या आहेत. नगरसेवक व लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

सरकारी यंत्रणा कर कशाचा घेतात
स्मार्ट सिटी केवळ नावापुरती आहे. दररोज खड्डेमय रस्त्यातून चिखल तुडवीत घर गाठावे लागते. दिनचर्येसाठी दूषित पाण्यावरच अवलंबून आहोत. परिसरातील नागरिकांना आजारांची लागण होत आहे. अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. जवळच नाला असल्याने थोड्या पावसातही घराच्या पायरीपर्यंत पाणी येते. नागरी सुविधाच होत नसतील तर सरकारी यंत्रणा कर कशाचा घेतात.
- बंडूजी पांडे,
स्थानिक रहिवासी

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of civic amenities in Giri Balaji Nagar and Kakade layout