अरेरे, "त्या' शंभर बकऱ्यांचा नाहक गेला जीव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

कोळसा भरलेल्या ट्रकच्या चालकाने महामार्गावर येण्यासाठी वळण घेताच नागपूरकडे भरधाव जाणारा बकऱ्या भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात दोन्ही ट्रक चक्काचूर झाले. बकऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. ट्रकधील शेकडो बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या.

टेकाडी/कन्हान (जि.नागपूर) : ओसीएम कोळसा खाणीतून कोळसा भरलेला ट्रक डुमरी सायडिंगला जात असताना महामार्गावरून जात असलेल्या बकऱ्या भरलेल्या ट्रकला जबर धडक दिली. त्यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून साधारणतः शंभर बकऱ्या मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कन्हान पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी चालकाला रुग्णालयात हलविले. मृत बकऱ्यांना महामार्गाच्या पलीकडे करण्याचे काम सुरू केले होते. अपघातानंतर तासभर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

अधिक वाचा  : नागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी

कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महामार्गालगत असलेल्या अण्णा मोड येथून खुल्या कोळसा खाणीतून निघणारा कोळसा ट्रकमध्ये भरून डुमरी सायडिंगला आणला जातो. डुमरीकडे जाण्यासाठी महामार्गावर असलेल्या धोक्‍याच्या वळणावर अनेक जण अपघातात जिवास मुकतात. कोळसा भरलेल्या ट्रकच्या चालकाने महामार्गावर येण्यासाठी वळण घेताच नागपूरकडे भरधाव जाणारा बकऱ्या भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात दोन्ही ट्रक चक्काचूर झाले. बकऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. ट्रकधील शेकडो बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या.

अधिक वाचा  : मध्यरात्री सुरू होते खोदकाम, कामगारांच्या अंगावर कोसळला ढिगारा

ट्रकचालकाने काढला पळ
घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच हेडकॉन्स्टेबल कुरेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत बकऱ्यांना बाजूला सारून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. कोळसा ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. बातमी लिहिस्तोवर जखमी आणि पसार ट्रकचालकाचे नाव कन्हान ठाण्यात दाखल झालेले नव्हते. पुढील तपास कन्हान पोलिस करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oops, "those 'hundred goats went unharmed