मोकळे भूखंड डेंगी, मलेरियाचे ‘हॉटस्पॉट'

राजेश प्रायकर
Tuesday, 3 November 2020

दरवर्षी डेंगीच्या नियंत्रणासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातात. परंतु यंदा संपूर्ण प्रशासन कोव्हीडच्या संघर्षात व्यस्त असल्याने डेंगीवरील उपाययोजनेचा विसर पडल्याचे दिसून येते. परिणामी सप्टेंबरमध्ये १८ डेंगीचे रुग्ण आढळून आले. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ६६ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाल्याची नोंदही महापालिकेने केली.

नागपूर : शहरातील मोकळे भूखंड नेहमीच डोकेदुखी ठरले असून आता मलेरिया, डेंगीचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोव्हीडचा प्रभाव कमी होत असतानाच शहरात डेंगी, मलेरिया पाय पसरत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काही ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर गुडघाभर पाणी साचले तर काही भूखंडांवर झुडपं तयार झाली आहेत. त्यामुळे कोरोनाशी संघर्ष करीत असलेल्या नागपूरकरांपुढे नवे आव्हान उभे झाले आहे. 

गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेने कोरोनावर लक्ष केंद्रित केले. कोरोनाविरुद्धच्या संघर्षाला साऱ्यांनीच प्राधान्य दिले. त्यामुळे आता कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आला. त्याचवेळी इतर आजारही शहरात पाय पसरत असल्याचे दिसून येते. मागील सप्टेंबरमध्ये शहरात डेंगीचे १८ रुग्ण आढळून आल्याची नोंद महापालिकेने केली. परंतु त्यावर उपाययोजनांकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

दरवर्षी डेंगीच्या नियंत्रणासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातात. परंतु यंदा संपूर्ण प्रशासन कोव्हीडच्या संघर्षात व्यस्त असल्याने डेंगीवरील उपाययोजनेचा विसर पडल्याचे दिसून येते. परिणामी सप्टेंबरमध्ये १८ डेंगीचे रुग्ण आढळून आले. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ६६ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाल्याची नोंदही महापालिकेने केली.

डेंगीचा प्रकोप वाढत असतानाच बेलतरोडी मार्गावरील रमानगरातील मोकळ्या भूखंडांवर गेल्या सहा महिन्यांपासून गुडघाभर साचलेल्या पाण्यावरून मलेरिया वाढण्याची चिन्हे आहेत. रमानगरातील गल्ली क्रमांक तीनमधील या भूखंडांच्या बाजूला असलेली सिवेज लाईनला गळती लागली असून, घाण पाणी भूखंडांवर जमा होत आहे.

सध्या गुडघाभर पाणी जमा झाले असून, या परिसरातील नागरिकांनी नगरसेवक संदीप गवई यांना अनेकदा फोनवरून माहिती दिली. परंतु गवई यांना अद्याप परिसरात येऊन पाहण्याचीही वेळ मिळाली नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी नमूद केले. या प्लॉटजवळच अनेक लहान मुले खेळत असतात. त्यांना मलेरियाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत ऩाही. रमानगरातील या मोकळ्या भूखंडाप्रमाणेच शहरातील इतर भूखंडांचीही स्थिती आहे.

अर्धवट सिमेंट रस्त्यांचे नागपूरकरांना धक्के

अनेक भूखंडांवर झुडपं वाढली आहेत. त्यातून डासांसह वेगवेगळे किटाणू शेजारच्या घरांमध्ये शिरत आहे. मोकळ्या भूखंडधारकांचा शोध लावण्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे मोकळे भूखंड मलेरिया, डेंगीचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे.
 
आरोग्य समिती सभापतींच्या प्रभागातच डेंगी रुग्ण
महापालिकेचे आरोग्य समिती सभापती विक्की कुकरेजा यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये डेंगीचा एक रुग्ण आढळून आला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये चार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये दोन, धरमपेठ झोनमध्ये एक रुग्ण आढळला. प्रेमनगरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ऑगस्टमध्ये १६ तर जुलैमध्ये १० डेंगीचे रुग्ण आढळून आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open plots dengue, malaria's hotspots