
कृषी व महसूल विभागांनी नुकसानीची माहिती शासनाकडून पाठविली आहे. अशात नुकसानीच्या अहवालाच्या आधारे विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व तसेच शासनाने ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड, काटोल तालुक्यातील अंबिया बहाराच्या संत्र्यांची बाजारपेठेत मागणी नसल्यामुळे मातीमोल भावाने संत्रा बगायतदार शेतकऱ्यांना विक्री करावी लागत आहे. नागपूर-कळमना बाजारपेठेत सर्वाधिक भाव ११ हजार रुपये टनाप्रमाणे खरेदी केली जात आहे. तर काटोल येथील बाजारपेठेत ५००० रुपये ते ९००० रुपये प्रती टन या भावाने व्यापारी संत्र्याची खरेदी करीत आहे. सर्वाधिक फटका दिल्ली येथील वाहतूक कोरोनामुळे बंद असल्यामुळे संत्रा जात नसल्यामुळे बसत आहे. दक्षिण भारत आलेल्या चक्रीवादळामुळे त्या भागात मागणी नसल्यामुळे देखील संत्र्याचे भाव कोसळले आहे.
आधीच अति पावसामुळे बुरशीजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात फळांची गळती झाली आहे व आता ही गळ सुरू आहे. नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. संत्र्याचे मोठे नुकसान होत असून ही शासनाकडून अजूनही शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले नाही.
विमा काढलेल्या शेतकऱ्यांना देखील विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांच्या खात्यातून विम्याच्या हफ्त्यांची कपात करण्यात आली आहे, पण याकडे कोणाचे लक्ष नाही.
कृषी व महसूल विभागांनी नुकसानीची माहिती शासनाकडून पाठविली आहे. अशात नुकसानीच्या अहवालाच्या आधारे विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व तसेच शासनाने ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उत्पादन खर्चही निघत नाही
आंबिया संत्र्याचे बेहाल झाले आहे. कोणी विचारायला पण तयार नाही. या वर्षाचा शेतीचा पूर्ण हंगाम बुडाला आंबिया बहाराच्या संत्र्याच्या उत्पनाची खूप मोठी आशा शेतकऱ्याला होती. पण आज संत्रा ५ रुपये ते ८ रुपये किलो भावाने विकला जात आहे. संत्र्याचा उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती आहे.
- दिलीप काळमेघ,
शेतकरी, जामगाव (बु.)
जिल्हाधिकारी यांनी पुधार घ्यावा
अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना सन २०१९-२० या वर्षातील विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. पण नागपूर जिल्ह्यात मात्र करण्यात आली नाही. जिल्ह्यात ज्या विमा कंपनी अधिकृत नेमलेल्या आहे. त्या विमा कंपनीना शासनाकडून आदेश काढून नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुधार घ्यावा. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत फोनवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी जि.प. सदस्य सलील देशमुख देखील उपस्थित होते.
- वसंत चांडक
माजी सभापती, पंचायत समिती नरखेड
संपादन - नीलेश डाखोरे