वीजग्राहकांच्या संतापाचा भडका, सुरक्षारक्षकाला मारहाण, अधिकाऱ्याला धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

महाल येथे रहिवासी मनोज धोपटे तुळशीबाग उपविभागीय कार्यालयात आला होता. कार्यालयातील लिपिक पूर्वेश ठाकरे यांनी धोपटेचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण, रागाच्या भरात बाहेर येऊन ते ग्राहकांना भडकवण्याचा प्रयत्न करू लागले. सुरक्षारक्षक चंद्रशेखर बनसोड यांनी आक्षेप घेतला. यामुळे मनोज धोपटे आणि त्यांच्यासोबत असणारा तन्मय भोसकरने आपल्यावर हल्ला केला. कपडे फाडून लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचा ठाकरे यांचा आरोप आहे.

नागपूर : भरमसाट बिलामुळे वीजग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. महावितरणच्या तुळशीबाग उपविभागीय कार्यालयात ग्राहकांच्या संतापाचा गुरुवारी दुपारी अचानक भडका उडाला. त्यातून सुरक्षारक्षकाचे कपडे फाडून मारहाण करण्यात आली. अतिरिक्त कार्यकारी अभियंतासुद्धा या रोषाला सामोरे जावे लागले, त्यांनासुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. 

लॉकडाउनचे नियम शिथिल होताच महावितरणकडून वीजग्राहकांना मीटररीडिंग घेऊन छापील देयक वाटल्या जात आहेत. काही ग्राहकांना यावर आक्षेप असल्याने ते उपविभागीय कार्यालयात दुरुस्तीसाठी आणि माहितीसाठी जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना टोकन देऊन क्रमानुसार, आत पाठविले जात आहे. टोकन पद्धतीमुळे बाहेर असणाऱ्या ग्राहकांना तासन्‌तास वाट बघावी लागते. आत गेल्यावरही कोणतीच सुनावणी होत नसल्याचा ग्राहकांचा आरोप असून, हेच वादाचे प्रमुख कारण ठरले. 

महावितरणच्या दाव्यानुसार, महाल येथे रहिवासी मनोज धोपटे तुळशीबाग उपविभागीय कार्यालयात आला होता. कार्यालयातील लिपिक पूर्वेश ठाकरे यांनी धोपटेचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण, रागाच्या भरात बाहेर येऊन ते ग्राहकांना भडकवण्याचा प्रयत्न करू लागले. सुरक्षारक्षक चंद्रशेखर बनसोड यांनी आक्षेप घेतला. यामुळे मनोज धोपटे आणि त्यांच्यासोबत असणारा तन्मय भोसकरने आपल्यावर हल्ला केला. कपडे फाडून लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचा ठाकरे यांचा आरोप आहे.

शाॅक लगा! वाढीव वीजबिलाबाबत काय म्हणणे आहे महावितरणचे वाचा...

तुळशीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव कार्यालयात आले असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. वादावादीच्या आवाजामुळे महावितरणचे कर्मचारी बाहेर आले असता, त्यांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी धोपटे, भोसेकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

महावितरचे निवृत्त कर्मचारी रुग्णालयात 
उपस्थित ग्राहकांनी मात्र आरोप फेटाळून लावले. त्यांच्या दाव्यानुसार तन्मय भोसकर हे आजोबा माधवराव यांना घेऊन बिलासंदर्भातील तक्रार घेऊन आले होते. माधवराव एमएसईबीचे निवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या पत्नी मायाताई या भाजपच्या नगरसेविका राहिल्या आहेत. घटनेच्यावेळी 300 हून अधिक ग्राहक कार्यालयात होते. बिलासंदर्भात काहीच ऐकून न घेता ते भरण्यास सांगितले जात असल्याने संतापाचा भडका उडाला. त्यात सुरक्षारक्षकाने ज्येष्ठ नागरिक माधवराव यांना आढून घेतले. त्यातूनच मारहाणीचा प्रकार घडल्याचे उपस्थित सांगतात. घटनेनंतर माधवराव यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अनेकांनी घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असून अधिकाऱ्यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ग्राहकांकडूनही पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outrage of electricity consumers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: