पोटच्या गोळ्याला सोडून आई-वडिलांचे रुग्णालयातून पलायन, का आली ही दुर्दैवी वेळ 

Sunday, 13 September 2020

झोपडीवजा पालात त्यांचा संसार आहे. मंदा आणि संतोष दोघेही मजुरी करतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. त्यादरम्यान मंदा गर्भवती होती. हाताला काम नसल्यामुळे संतोष भटकत होता. मात्र काम मिळत नव्हते.

नागपूर : अवघ्या १२ दिवसांच्या बाळाला रूग्णालयात सोडून आई-वडिलांनी पळ काढला. औषध द्यायचे असल्याने एका परिचारिकेने चिमुकलीच्या आईला आवाज दिला. मात्र बाळाची आई आणि वडील दोघेही फरार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे याप्रकरणी अजनी पोलिसांनी माय-बापाविरुद्ध अपत्यास बेवारसस्थितीत सोडण्याचा गुन्हा दाखल केला आहे. मंदा संतोष कासरकर (वय २५) व तिचा पती संतोष कासरकर (वय ३०), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरला यवतमाळमधील जीएम हॉस्पिटलने १२ दिवसांच्या मुलीला मेडिकलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कासरकर दाम्पत्याला दिला. दोघेही तिला घेऊन मेडिकलमध्ये आले. तिच्यावर उपचार सुरू असताना कासरकर दाम्पत्य पसार झाले. शनिवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यवतमाळ कंट्रोल रूमला अजनी पोलिसांनी कळविले आहे. त्यामुळे चिमुकलीच्या आईवडिलांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

क्लिक करा - मित्राचे काकूशी अनैतिक संबंध; रंगेहात पकडल्याने केला खून
 

आर्थिक परिस्थितीने ओढवला प्रसंग

सूत्रांच्या माहितीनुसार, संतोष आणि मंदा हे यवतमाळ शहरालगत असलेल्या एका खेडेगावात राहतात. झोपडीवजा पालात त्यांचा संसार आहे. मंदा आणि संतोष दोघेही मजुरी करतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. त्यादरम्यान मंदा गर्भवती होती. हाताला काम नसल्यामुळे संतोष भटकत होता. मात्र काम मिळत नव्हते.
 

गोंडस बाळाला दिला जन्म

गेल्या एक सप्टेंबरला मंदाला यवतमाळच्या जीएम शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र जन्मजात कोणतातरी आजार असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांनी नागपूरला हलविण्यास सांगितले. ११ सप्टेंबरला संतोष आणि मंदाने बाळाला मेडिकलमध्ये दाखल केले.
 

पैसे संपले आणि भूकही लागली

संतोषने एका मित्राला ५०० रूपये हातउसने मागितले. ते पैसे घेऊन तो नागपुरात आला. मुलीला मेडिकलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टरांनी सांगितलेले औषध आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. दोघेही दोन दिवसांपासून उपाशी होते. दोघांनीही उपचार करण्यास असक्षम असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हृदयावर दगड ठेवून पोटच्या गोळ्याला सोडून पायीच घराकडे निघाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents escape from the hospital after leaving 12-day-old baby