मोतियाबिंदू शस्त्रक्रियेसाठी वाट बघत असताना वृद्धाला आली भोवळ, मग... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

साठ वर्षीय वृद्ध मोतियाबिंदू शस्त्रक्रियेसाठी डागा स्मृती स्त्री रुग्णालयात आपल्या क्रमांकाची वाट पाहत होते. नरेंद्र यांचा क्रमांक येण्याच्या काही मिनटांपूर्वी भोवळ आली आणि ते खाली कोसळे. डॉक्‍टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली. रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद असल्याने छातीवर दाब देत ते परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. 

नागपूर : डागा स्मृती शासकीय रुग्णालयात दाखल वृद्धाचा मोतियाबिंदू शस्त्रक्रियेपूर्वीच मृत्यू झाल्याने येथील डॉक्‍टरांसह इतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या रुग्णाचे शनिवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे शवविच्छेदन झाले. त्याच्या अहवालावरूनच या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. नरेंद्र उर्फ बंडू विठोबा रेवतकर (60, रा. भिष्णूर, ता. नरखेड, जि. नागपूर) असे दगावलेल्या वृद्धाचे नाव आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आयोजित एका शिबिरात नरेंद्र रेवतकर यांना मोतियाबिंदू असल्याचे निदान झाले. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते शासकीय योजनेतून निःशुल्क शस्त्रक्रियेसाठी सहा फेब्रुवारीला नागपुरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आले. येथे वृद्ध दाखल झाल्यावर त्यांना सात फेब्रुवारीला शस्त्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट केले गेले. शुक्रवारी डागात सकाळी शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. येथे प्रतीक्षेतील रुग्णांसोबत वृद्धही त्यांच्या क्रमांकाची वाट बघत होते. 

हेही वाचा - लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

नरेंद्र यांचा क्रमांक येण्याच्या काही मिनटांपूर्वी त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळताच येथील डॉक्‍टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली. तातडीने वृद्धाला शस्त्रक्रिया गृहात हलवून हृदयासह रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद असल्याने छातीवर दाब देत ते परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. 

अहवालानंतर कळणार मृत्यूचे कारण

वृद्धासोबत रुग्णालयात कुणी नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कागदपत्रावरील नातेवाईकाचा मोबाईल नंबर लावत त्यांना तातडीने रुग्णालयात बोलावून घेतले. रुग्णाला मेयोत हलवण्यात आले. वृद्धाचे शनिवारी शवविच्छेदन केल्यावर मृतहेत नातेवाईकांच्या सूपूर्द करण्यात आला. शवविच्छेदन अहवालाच्या अहवालावरूनच या रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. पातूरकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient death before cataract point surgery