अहोऽऽ चुकीच्या उपचारानेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला; आरोपानंतर पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

केवल जीवनतारे
Tuesday, 17 November 2020

रुग्णालयाकडून उपचारादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजही मागण्यात आले आहे. डीसीपी झोन २ नेही मेडिकलकडे चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. तर सीताबर्डी पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनीही रुग्णालयाला सीसीटीव्ही फुटेज मिळावे असे पत्र दिले आहे.

नागपूर : पंचशील चौकातील एका खासगी रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताच्या मुलाने केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर शवविच्छेदनही केले. अहवालात उपचारादरम्यान काही त्रुट्या असल्याचे संकेत मिळाल्यानंतर पोलिसांना चौकशीसाठी पत्र देण्यात आले. शिवाय, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.

पंचशील चौकातील केयर रुग्णालयात २८ ऑक्टोबरला अरुण थुल यांचे निधन झाले. निधनापूर्वी त्यांच्यावर आठवडाभर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. १७ ऑक्टोबरला ते जेवण करीत नसल्याने प्रथम शहरातील दोन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर केअर रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते.

सविस्तर वाचा - चारित्र्यावर संशय घेतल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करुण अंत, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

‘युवा करियर’चे मोनाल थुल या त्यांच्या मुलाला डॉक्टरांनी २८ ऑक्टोबरला अचानक प्रकृती बिघडल्याचे कारण सांगून रुग्णास आयसीयुमध्ये हलविले. त्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, उपचारावेळी मृताच्या मुलाने काही शंका उपस्थित केल्यानंतर व लघवी ठिकाणी रक्त साचल्याने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा आग्रह करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.

रुग्णालयाकडून उपचारादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजही मागण्यात आले आहे. डीसीपी झोन २ नेही मेडिकलकडे चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. तर सीताबर्डी पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनीही रुग्णालयाला सीसीटीव्ही फुटेज मिळावे असे पत्र दिले आहे.

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

मेडिकलमध्येही चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात यावी तसेच चौकशी करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत, असे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी उपचारात कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचा दावा केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient dies due to wrong treatment in Nagpur