चारित्र्यावर संशय घेतल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करुण अंत, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

अनिल कांबळे
Monday, 16 November 2020

पायलच्या आईने डोंगरगढ पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर ती नागपुरात प्रियकरासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी पायल आणि शुभम यांना पकडले आणि परत आणले. परंतु, पोलिस ठाण्यात पायलने आईसोबत जाण्यास नकार देत शुभमसोबत पुन्हा नागपुरात आली.

नागपूर : तीन मुलांचा बाप असलेल्या युवकासोबत पळून आलेल्या प्रेयसीवर वर्षभरात आत्महत्या करण्याची वेळ आली. वस्तीतील कुण्यातरी युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत प्रियकराच्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल शुभम भवरेल (२५, रा. वैष्णोदेवीनगर, कळमना) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भवरेल मध्यप्रदेशातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगढ येथे साफसफाईचे काम करीत होता. त्याला पत्नी व तीन मुले आहेत. यादरम्यान त्याचे पायल (२१) हिच्यासोबत सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

प्रेमप्रकरणाची चर्चा गावभर झाली. त्यामुळे पायलने त्याला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघांनीही वर्षभरापूर्वी गावातून पळ काढला. त्यांनी थेट नागपूर गाठले. दोघेही कळमन्यातील वैष्णोदेवीनगरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते.

पायलच्या आईने डोंगरगढ पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर ती नागपुरात प्रियकरासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी पायल आणि शुभम यांना पकडले आणि परत आणले. परंतु, पोलिस ठाण्यात पायलने आईसोबत जाण्यास नकार देत शुभमसोबत पुन्हा नागपुरात आली.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

बहिणीला केला फोन

पायल आणि शुभम नागपुरात किरायाने राहायला लागले. यादरम्यान शुभमचे आणखी एका युवतीशी सूत जुळले. तसेच तो पायलच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला मारहाण करीत होता. तिने बहिणीला फोन करून शुभमबाबत सांगितले होते. सततच्या त्रासामुळे ती कंटाळली होती. त्यामुळे पायलने दिवाळीच्या पूर्वसंध्येला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशाप्रकारे प्रेमविवाहाचा करुण अंत झाला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beloved suicide due to suspicion on character