नागपुरात एकाच दिवशी रुग्ण बरे होण्याचा उच्चांक; एवढ्या जणांनी केली कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

मोठ्या संख्येने कोरोनावर विजय मिळवल्यामुळे मेयो आणि मेडिकलमध्ये डॉक्‍टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरुवारी टाळ्या वाजवून या विजेत्यांचे अभिनंदन केले. बरे झालेल्या रुग्णांनी घरीच राहावे. बाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. 

नागपूर : उपराजधानीत 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यांनी कधीच कोरोनावर मात केली. परंतु, त्यानंतर उपराजधानीतील मोमिनपुरा, सतरंजीपुरा येथे कोरोनाचे हॉटस्पॉट तयार झाले आणि बाधितांचा आकडा फुगला. त्याच तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनामुक्त झालेल्या वस्त्यांच्या यादीत मोमिनपुरा टॉपवर आहे. त्यापाठोपाठ सतरंजीपुरा येथील सर्व रुग्ण बरे झाले आहेत. 

गुरुवारी मेडिकलमधून 47 तर मेयोतून 30 जणांनी कोरोनावर मात केली. यात पाच वर्षांच्या चिमुकल्यापासून तर 65 वर्षांच्या वृद्धांचा समावेश आहे. विशेष असे की, 1 ते 16 वर्षे वयोगटातील 6 मुलांचा मेडिकलमधून बरे झालेल्यांच्या यादीत समावेश आहे. मेयोतून बरे झालेल्या रुग्णांमध्येही चिमुकल्या मुलांसह वयस्कांचा समावेश आहे. विशेष असे की, गर्भवती मातेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनावर विजय मिळवल्यामुळे मेयो आणि मेडिकलमध्ये डॉक्‍टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरुवारी टाळ्या वाजवून या विजेत्यांचे अभिनंदन केले. बरे झालेल्या रुग्णांनी घरीच राहावे. बाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. 

उपराजधानीत दर दिवसाला पन्नास, साठ रुग्ण वाढल्याचा उच्चांकी आकडा दिसत होता. मात्र, गुरुवारी एकाच दिवशी 77 जणांनी कोरोनावर मात केली. हा रुग्ण बरे होण्याचा उच्चांक आहे. ही नागपूरकरांना दिलासा देणारी बाब आहे. कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्यांच्या मनातून कोरोनाबद्दलची भीती कमी होण्यास मदत होईल. गुरुवारी मेयो, मेडिकल आणि एम्समधून 77 जणांना कोरोनामुक्त घोषित करीत त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत या तिन्ही रुग्णालयांतून सुमारे 765 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा : आता बोंबला! आरोपीला झाला कोरोना अन्‌ माजली खळबळ...

डॉक्‍टरांचे आभार 
मेयो-मेडिकलसह एम्समधूनही एका व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. एम्सच्या डॉक्‍टरांनी कोरोनामुक्त घोषित केल्यानंतर त्या रुग्णाने डॉक्‍टरांचे आभार मानले. याशिवाय मेयो, मेडिकलमधून घरी जात असलेल्या कोरोना विजेत्यांनी डॉक्‍टरांचे हात जोडून आभार मानले. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा, अशी प्रतिक्रिया कोरोनातून बरे झालेल्या एका व्यक्तीने नोंदवली. मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये नाईक तलाव, बांगलादेश, पाचपावली, लोकमान्य नगर (हिंगणा) परिसरातील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient recoverd from the corona disease