झाली दगडफेक, फुटल्या काचा, घातला गोंधळ...वाचा नेमके काय?

super
super

नागपूर : मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी हृदय शल्यक्रियाशास्त्र (सीव्हीटीएस) विभागात उपचारादरम्यान एक रुग्ण दगावला. यामुळे संतप्त नातेवाइकांनी गैरसोयीचा आरोप करीत गोंधळ घातला. त्यात पुन्हा भर पडली आहे. चक्क मेडिकलमध्ये कार्यरत कर्मचारी धुळवडीच्या दिवशी दगावला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वॉर्डासह मुख्य प्रवेशद्वारावरील काचा फोडल्या. या भागात अजनी पोलिसांची गस्त असल्याने पोलिसांचा ताफा तत्काळ आला. त्यांनी मध्यस्थी केल्याने अनुचित प्रकार टळला. या घटनेनंतर सुपरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
रूपलाल मलिक (वय 46) असे दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. 28 फेब्रुवारीला रूपलाल अत्यवस्थ होते. याच दिवशी सुपरमध्ये स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांनी शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे येथील डॉक्‍टरांनी नातेवाइकांना वारंवार सांगितले. दरम्यान, डॉक्‍टरांनी अखेरपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. 28 फेब्रुवारीला ओपन हार्ट सर्जरी झाली. स्थिर अवस्थेत आणण्यासाठी डॉक्‍टरांनी बरेच वेळा रक्त दिले. मात्र, 10 मार्च रोजी सायंकाळी साडेपाचदरम्यान रूपलाल यांची प्रकृती खालावली. डॉक्‍टरांनी पंधरा दिवसांपासून त्या रुग्णाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचाराला पाहिजे तशी दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे होते. दरम्यान, 10 मार्च रोजी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. हाणामारीची बातमी कळताच पोलिसांचा ताफा तत्काळ सुपरमध्ये तैनात झाला आणि पुढील प्रसंग टळला.

मृतदेह घेऊन जाताना नातेवाईक झाले संतप्त
रूपलाल मलिक यांचा मृतदेह स्वीकारल्यानंतर मात्र नातेवाइकांनी डॉक्‍टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. डॉक्‍टरांनी काळजी घेतली नसल्याची तक्रार नोंदवीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संतप्त नातेवाइकांनी सुपरच्या सीव्हीटीएस वॉर्डातील प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. मृतदेह खाली आणत असताना प्रवेशद्वारावरील काचा फोडल्या. या वेळी अजनी पोलिसांचा ताफा तैनात झाला. यामुळे अनुचित प्रकार थांबला. तणाव निवळला. माहिती मिळताच सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी सुपर गाठले. उर्वरित कोणीही अधिकारी येथे उपस्थित झाले नाही.

वॉर्डातील रुग्ण शॉकमध्ये
रूपलाल यांचा धुळवडीच्या दिवशी मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी वॉर्डात मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर लाथा मारल्या. काचा फोडल्या. वॉर्डात आरडाओरड केली. यामुळे वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. हृदयविकाराचे रुग्ण शॉकमध्ये जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. येथे कार्यरत परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने संतप्त नातेवाइकांना बाहेर जाण्यासाठी वारंवार विनवणी करण्यात येत होती.

काचा फोडणे योग्य नाही

हृदय शल्यक्रियाशास्त्र विभागात डॉक्‍टरांकडून जीव वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. परंतु, दुर्दैवाने रूपलाल यांचा मृत्यू झाला. विशेष असे की, ते मेडिकलचे कर्मचारी होते. त्यांच्या कुटुंबीयांना याची सारी जाणीव आहे. यानंतरही त्यांनी डॉक्‍टरांवर संताप व्यक्त करणे, काचा फोडणे योग्य नाही. घटनेची माहिती मिळताच सुपरमध्ये पोहोचलो.
डॉ. मिलिंद फुलपाटील,
विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com