कारवाईचे धडक अभियान, साडेचारशे फुकट्यांना एकाच दिवसात चाप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

फुकट्यांमुळे रेल्वेचा महसूल बुडण्यासोबतच प्रवाशांनाही गैरसोयींचा सामना करावा लागतो. यावर आळा घालण्यासाठी वारंवार तपासणी मोहीम राबविण्यात येते; परंतु फुकट्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता. 24) नागपूर विभागातील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर ही मोहीम राबविण्यात आली.

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली. एकाच दिवशी साडेचारशे फुकट्यांची धरपकड करीत सुमारे दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला.

फुकट्यांमुळे रेल्वेचा महसूल बुडण्यासोबतच प्रवाशांनाही गैरसोयींचा सामना करावा लागतो. यावर आळा घालण्यासाठी वारंवार तपासणी मोहीम राबविण्यात येते; परंतु फुकट्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता. 24) नागपूर विभागातील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर ही मोहीम राबविण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एच. के. बेहेरा यांच्या मार्गदर्शनात 11 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 2 आरपीएफ जवानांनी कारवाईचे धडक अभियान राबविले.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढेंची पंचिंग मशीनलाही वाटते भीती, वाचा काय झाले...

यात पाच प्रमुख रेल्वेगाड्यांसह सर्वच प्रमुख रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात 53 विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून 24 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनधिकृत डब्यात बसून जाणारे एकूण 269 प्रवासी अडकले. त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार 760 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोबतच नोंदणीशिवाय मालवाहतुकीची 127 प्रकरणे समोर आली. संबंधितांकडून 12 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण 449 प्रकरणांमध्ये 1 लाख 40 हजार 910 रुपयांची दंडवसुली करण्यात आली.

कारवाईचा सामना करावा लागेल
प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. मासिक पासधारकांनीसुद्धा अनारक्षित डब्यातूनच प्रवास करावा. व्यावसायिकांनीही नोंदणी करूनच मालवाहतूक करावी; अन्यथा अशा प्रकारच्या कारवाईचा सामना करावाच लागणार आहे. यापुढेही नियमित कारवाई सुरू राहील.
सोमेश कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर, मध्य रेल्वे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: penalty to without ticket passengers by railway