
सकाळी सूर्योदयानंतर दिसणारा केशरी रंग काही वेळातच गायब होऊन रंगबिरंगी पतंगांनी आकाश ताब्यात घेतले. सकाळीपासूनच चिमुकल्यांपासून तर तरुणाईपर्यंत साऱ्यांनीच मांजा, डझनभर पतंग घेऊन गच्चीवर ताबा मिळवला.
नागपूर ः ‘ओ.. काट.., ढिल दे रे.., कट गयी रे पतंग..’ असा आरडाओरड करीत शहरातील विविध भागात मोठय़ा उत्साहात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. गच्चीवर कुटुंबांसोबत तर कुणी मित्रांसोबत पतंग उडविताना दिसून आले. त्यामुळे विविध रंगांच्या पतंगांमुळे आकाशाच्या कॅन्वव्हॉसवर रंग उधळल्याचे चित्र दिसून आले. एवढेच नव्हे अनेकांनी डीजे लावल्यामुळे हवेत जणू संगीताच्या तालावर पतंगांची जुगलबंदी रंगल्याचे चित्र होते. पतंगोत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातामुळे अनेक पालक सुटी घेऊन चिमुकल्यांच्या उत्साहात सामील झाले होते.
सकाळी सूर्योदयानंतर दिसणारा केशरी रंग काही वेळातच गायब होऊन रंगबिरंगी पतंगांनी आकाश ताब्यात घेतले. सकाळीपासूनच चिमुकल्यांपासून तर तरुणाईपर्यंत साऱ्यांनीच मांजा, डझनभर पतंग घेऊन गच्चीवर ताबा मिळवला. काही नागरिकांनी शहरातील मोकळ्या मैदानात पतंग उडविण्यासाठी जागा शोधली. नायलॉन मांज्यावर बंदी असल्याने तसेच दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातामुळे अनेक पालकांनी मुलांना साध्या दोराच्या सहाय्याने पतंग उडविण्यास प्रोत्साहित केले.
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
चिमुकले तसेच तरुणाईमध्ये यानिमित्त उत्साह दिसून आला तर घरातील पालकांंमध्ये अनामिक भीती दिसून आली. अनेक पालकांनी मुलांसोबत राहणे पसंत केले. त्यांनी खाद्यपदार्थही गच्चीवर सोबत घेतले. त्यामुळे एकप्रकारे गच्चीवर कौटुंबिक सहलच साजरी झाली. काही हौशी तरुणांनी गच्चीवर डीजे लावून पतंग उडविण्याचा आनंद लुटला. सकाळी वाराही असल्याने पतंग उडविण्यास अनुकूल वातावरण होते. त्यामुळे पतंगप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला.
आवडते पदार्थ, गाण्यावर ठेका धरीत अनेकजण गच्चीवर पतंग उडविताना दिसून आले. दुपारपर्यंत आकाशात पतंगांची चांगलीच गर्दी झाली. ‘ढील दे रे’, ‘जाऊ दे सैती सैती’ ‘अबे खिच’ वगैरे संवाद हे प्रत्येकाच्या तोंडी होते. पतंग कापल्यावर आनंदातिरेकाने ‘ओ काट’च्या घोषणा ऐकू येत होत्या. ज्याचा पतंग कापला त्याच्या तोंडी मात्र शिव्याच येत होत्या. पतंग उडविणारा असो की नको, आज सर्वाच्या नजरा आकाशाकडेच होत्या. अस्सल पतंगबाजाच्या नजरेत कटून आलेली आणि हवेत हेलकावणारी पतंग हमखास पडत होती. दिवसभर पतंगांची कापाकापी व ‘ओ काट’ सुरूच होते. सूर्य मावळतीला गेला तेव्हा पतंग उडविणे थांबले असले तरी आकाशात कटलेल्या पतंग उडतच होत्या. तारा, झाडांच्या फांद्यावर पतंग, मांजा अडकलेल्या दिसून आला.
पतंग पकडणाऱ्यांच्या संख्येत घट
पतंग उडविणाऱ्यांसोबतच त्या पकडणाऱ्यांचाही मोठा वर्ग दरवर्षी रस्त्यावर येतो. फांदी वा तारांची गुंडाळी बांधलेला उंच बांबू हातात घेऊन कटून आलेली पतंग वा मांजा पकडण्यासाठी धावणाऱ्यांची संख्या यंदा मात्र घटलेली दिसून आली. रस्त्यावर पतंग पकडण्याच्या नादात मोठे अपघात होत असल्याची जाणीव अनेक पालकांना यंदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पतंग उडवा, परंतु रस्त्यावर जाऊ नका, अशी तंबीच पालकांनी मुलांनाही दिल्याचे एका पालकाने सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील पतंग पकडणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली.
संपादन - अथर्व महांकाळ