हुंडाबळी : पन्नास लाखांसाठी महिला डॉक्टरचा छळ; पतीला २६ पर्यंत पीसीआर

अनिल कांबळे
Thursday, 24 December 2020

सतत होत असलेल्या छळाला कंटाळून मंगळवारी सकाळी रुचिता यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. रुचिता यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मंगेश याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

नागपूर : माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळूनच महिला डॉक्टर रुचिता मंगेश रेवतकर (वय ३०, रा. उपेंद्र अपार्टमेंट, नरेंद्रनगर) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बेलतरोडी पोलिसांनी रुचिता यांचे पती डॉ. मंगेश रेवतकर याला अटक केली आहे. पोलिसांनी मंगेशला बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

मंगेश हा धंतोलीतील खासगी रुग्णालयात काम करायचा. त्याला प्रशस्त हॉस्पिटल व मशीन घ्यायचे होते. माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी तो रुचिताचा छळ करायचा. चार दिवसांपूर्वी रुचिता यांनी मंगेश याच्या नातेवाइकांना छळाबाबत माहिती दिली. त्यानंतर मंगेश याचे मूळ गाव नरखेड येथे रुचिता व मंगेश यांच्या नातेवाइकांची बैठक झाली. याबाबत मंगेश याला कळले. त्यामुळे त्याने रुचिता यांना मारहाण केली.

हेही वाचा - वाहन चालकांनो, महामार्गावरील पिवळ्या, पांढऱ्या रेषांचा अर्थ आपणास माहीत आहे ना

सतत होत असलेल्या छळाला कंटाळून मंगळवारी सकाळी रुचिता यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. रुचिता यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मंगेश याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्याआधारे बेलतरोडी पोलिसांनी मंगेश व त्याची आई सुनंदा पुरुषोत्तम रेवतकर (वय ५२) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारीच मंगेशला अटक केली होती. त्याची दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा

पोलिसांनी घटनास्थळावरून आत्महत्येपूर्वी लिहिलेली रुचिता यांची चिठ्ठी जप्त केली आहे. चिठ्ठीत माहेरून पैसे आणण्यासाठी पती व सासू छळ करीत असून त्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा, अशी सूचनाही तिने केली आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करीत मंगेशला अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Persecution of a female doctor for fifty lakhs