कार्यालयात रक्कम मोजत होती कर्मचारी; तिघे दुचाकीने आले आणि तलवारीच्या धाकावर लुटून नेले

योगेश बरवड
Saturday, 10 October 2020

घटनेनंतर लगेच मालकाला फोनवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर यशोधरानगर पोलिसांना सूचना देण्यात आली. आरोपींची कार्यपद्धती लक्षात घेता ते परिसरातीलच रहिवासी असून त्यांना पेट्रोलपंपावरील सर्व हालचाली व प्रक्रियेबाबत पुरेसी कल्पना असावी, असा संशय होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवायला सुरुवात केली.

नागपूर : दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी तलवारीच्या धाकावर पेट्रोल पंपावरील रोख लुटून नेली. गुरुवारी रात्री यशोधरानगर हद्दीत यादवनगरातील पेट्रोलपंपावर हा सिनेस्टाईल घटनाक्रम घडला. याप्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जिशान ऊर्फ बाबा लंगड्या (२१), आरिफ अली लियाकत अली (२७) दोन्ही रा. यादवनगर आणि सूर्या जांभूळकर (१९, रा. आजरी माजरी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यादवनगरात मॉडर्न सेल सर्वे नावाचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पंप बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अधिक माहितीसाठी - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

पंपावरील कस्टमर अटेंडंट पदावर कार्यरत असणारी स्नेहा साखरे (३५) हिने कर्मचाऱ्यांकडून हिशेब घेतला. गोळा झालेली रक्कम केबिनमध्ये नेऊन मोजणी करीत होत्या. त्याच सुमारात २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन आरोपी दुचाकीवरून आले. गाडी थांबवताच एका आरोपीने केबिनच्या दिशेने धाव घेतली. स्नेहाला तलवारीचा धाक दाखवीत १६ हजार ४२० रुपयांची रोख हिसकावून घेतली. यानंतर गाडीवरून तिन्ही आरोपी पळून गेले. आरोपींच्या हातात तलवार असल्याने अन्य कर्मचाऱ्यांनीही भीतीपोटी आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही.

घटनेनंतर लगेच मालकाला फोनवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर यशोधरानगर पोलिसांना सूचना देण्यात आली. आरोपींची कार्यपद्धती लक्षात घेता ते परिसरातीलच रहिवासी असून त्यांना पेट्रोलपंपावरील सर्व हालचाली व प्रक्रियेबाबत पुरेसी कल्पना असावी, असा संशय होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवायला सुरुवात केली.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्यांचे लोकेशन मिळविण्यात आले. वनदेवीनगरातील रेल्वे पुलाखालून शिताफिने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून आठ हजार रुपये जप्त करण्यात आले. उर्वरित रक्कम दारू व जेवणावर खर्च करण्याची कबुली त्यांनी दिली.

शामबागेतील विहिरीत मृतदेह आढळला

सक्करदरा हद्दीतील शामबाग मैदानातील विहिरीत ५३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तर नंदनवन हद्दीतील जुना बगडगंज परिसरातील ७० वर्षीय वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. जुना बगडगंज येथील रहिवासी ज्ञानेश्वर अर्जुन मेश्राम (७०) यांनी घरी सिलिंग फॅनला नायलोनच्या दोरीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ९ वाजता ही घटना उघडकीस आली. दुपारी ते आपल्या खोलित निघून गेले. रात्र होऊनही बाहेर न आल्याने कुटुंबीय जेवणासाठी आवाज द्यायला गेले असता ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारात शामबाग मैदानाच्या मोकळ्या विहिरीत मृतदेह आढळून आला. राजू बोरकर (५३, रा. विश्वशांती बौद्ध विहार, जुना सक्करदरा) अशी मृताची ओळख पटवण्यात आली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A petrol pump was looted at the point of a sword