
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राज्य शासनातर्फे सर्वोच्च छत्रपती व अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते
नागपूर : राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्तीसंदर्भात शिवजयंतीपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील १०३ छत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू आपापला सन्मान शासनाला सन्मानाने परत करणार आहेत. तसा इशारा पुरस्कारविजेत्या खेळाडूंनी दिला आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राज्य शासनातर्फे सर्वोच्च छत्रपती व अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत राज्यभरातील शेकडो खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र पुरस्कारानंतरही अनेक खेळाडू सध्या बेरोजगार असून उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहेत. खेळाडूंना पुरस्कारापेक्षा आजच्या घडीला उपजीविकेसाठी नोकरीची खरी गरज असल्याचे बहुतांश खेळाडूंचे मत आहे.
Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता...
पुरस्कारविजेत्या खेळाडूंना थेट नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी खेळाडूंची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मागील चार वर्षांपासून यासंदर्भात ते राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, शासनाने अजूनपर्यंत यासंदर्भात कसलाही सकारात्मक निर्णय किंवा कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता नाईलाजाने हे खेळाडू आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारने यासंदर्भात येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत (शिवजयंतीपर्यंत) खेळाडूंच्या हिताचा अर्थात थेट नियुक्तीचा निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील १०३ शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू २४ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडक देऊन आपापले पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सन्मानाने परत करणार असल्याचे, औरंगाबादचे शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू सागर मगरे यांनी 'सकाळ'ला सांगितले.
मगरे म्हणाले, सांगली महानगरपालिकेने चार स्थानिक छत्रपती पुरस्कारविजेत्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार थेट नोकऱ्या दिल्या आहेत. त्याच आधारावर राज्यातील इतरही शहरातील खेळाडूंना नोकऱ्या देण्यात याव्यात, अशी आमची एकमेव मागणी आहे. औरंगाबाद, पुणे, ठाणे व अमरावती महापालिकेनेही असा ठराव मंजूर केला असल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.
सर्व रात्रीला मिळून जेवले, 'ते' खोलीत गेले...
रम्यान, आज शुक्रवारी नागपुरातील आंतरराष्ट्रीय तिरंदाज संदीप गवई, दामिनी रंभाड, रोशनी रिंके, कमलेश लांजेवार, प्रतिमा बॉंडे, नंदकुमार धनविजय इत्यादी खेळाडूंनी जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीसंदर्भात लेखी पत्र दिले. या पत्रात खेळाडूंनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून, हे पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्याचे दामिनीने सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ