कधी दरवळणार सीताबर्डीतील मार्केटमध्ये फुलांचा सुगंध?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

सरकारने इतर उद्योगधंदे उघडले आहे. त्याचप्रमाणे फूल मार्केटही उघडण्यात यावे, मनापाने ओटा किराया माफ करावा व मजुरांना आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी फूलविक्रेता संघाचे विजय वंजारी यांनी केली आहे.

नागपूर : लॉकडाउन चार संपण्यास एक दिवसाचा अवधी शिल्लक असताना अजूनही देशभरात अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झालेले नाही. त्यापैकी एक व्यवसाय म्हणजे फूलविक्री होय. कोरोनामुळे या व्यवसायावरही संकट आले आहे. लॉकडाउनमुळे नागपुरातील सीताबर्डी येथील नेताजी फूल मार्केट दोन महिन्यांपासून बंद आहे. फुलांचा सुगंध या मार्केटमध्ये कधी दरवळणार, अशी विचारणा येथील व्यापारी करीत आहेत.

लॉकडाउनमुळे नेताजी फूल मार्केट दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे फुलांचा व्यापार करणारे व्यापारी व फुलांचा व्यवसाय करणारे दुकानदार व फुलांची शेती करणारे शेतकरी यांच्याकडे काम करणारा मजूरवर्ग हा अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. या सर्वांचा विचार करून, नागपूर महापालिकेने नेताजी फूल मार्केट उघडण्याचा विचार करावा, अशी मागणी उत्पादक व चिल्लर फूलविक्रेता संघाने केली आहे. उन्हाळ्यात लग्नसराईचा मोसमात असतो. त्यावेळी काही फुलांना विशेष मागणी असते. मात्र, हा मोसम निघून गेल्याने आम्ही अडचणीत सापडलो आहो. आता मार्केट आणखी बंद ठेवून आम्हाला संकटात टाकू नका, अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे.

वाचा - Video : फडकर यांनी दिला रणजीतील 37 वर्षांपूर्वीच्या अजरामर खेळीला उजाळा

कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल शेतामध्ये तोडून फेकला त्यामुळे मजुरांची मजुरी त्यांना खिशातून द्यावी लागली. काहींनी तर फुलावर ट्रॅक्‍टर चालवून आपल्या शेतीचे नुकसान केले. पॉलिहाउस असलेल्यांनी महिन्याकाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च करीत फुलावरती फवारणी व खते देऊन ते रोपटे जगवत आहे. फूल मार्केट बंद असल्यामुळे संपूर्ण माल कचऱ्यात फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास पाच हजार शेतकऱ्यांचे फूल मार्केट बंद असल्यामुळे नुकसान झाले. नागपूर मध्ये चिल्लर दोन हजार दुकाने आहेत त्यांच्याकडे काम करणारे हजारो कामगारही बेरोजगार झाले आहेत. ज्याप्रमाणे सरकारने इतर उद्योगधंदे उघडले आहे. त्याचप्रमाणे फूल मार्केटही उघडण्यात यावे, मनापाने ओटा किराया माफ करावा व मजुरांना आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी फूलविक्रेता संघाचे विजय वंजारी यांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Please open Phool Market, demand made by market Association