चिमुकल्याला आईपासून केले विभक्त, बेकायदेशीररित्या बाळ दत्तक देणाऱ्या संस्थाचालकास अटक

विजयकुमार राऊत
Wednesday, 21 October 2020

महिलेला आपल्या आश्रमात जागा दिली व  त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनात तेथे राहू लागली. दोन महिन्यानंतर आधार कार्ड बनवून देतो म्हणून प्रयाग त्या महिलेस नागपूर घेऊन गेला. बाळ बेकायदेशीर दत्तक देण्याची मूळ कागदपत्रे तयार करून परस्पर एका दाम्पत्यास  बाळाला दत्तक दिले. त्या चिमुकल्याला आईपासून विभक्त केले. 

नागपूर - संस्थाचालकाने बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक दिल्याची घटना बुटीबोरी येथे घडली. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी संस्थाचालकास अटक केली असून मायलेकांची भेट घडवून आणली. 

प्रयाग डोंगरे, असे आरोपीचे नाव आहे. संबंधित महिलेचे हैदराबाद येथील नरेश या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. कोरोनाच्या परिस्थितीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दोघेही नागपूरजवळील बुटीबोरी येथे आले. मात्र, पतीला दारूचे व्यसन असल्याने तो तिला नेहमीच मारहाण करायचा. त्यामुळे तिने बुटीबोरी पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. याची माहिती पतीला मिळताच त्याने पत्नीला घराबाहेर काढले. यावेळी ती सहा महिन्याची गर्भवती होती. तिला एका महिलेने भोजनालयात आश्रय दिला. त्याच ठिकाणी तिची प्रसूती झाली. त्यानंतर तिची ओळख साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष व संचालक प्रयाग डोंगरेसोबत झाली. त्यांनी त्या महिलेला आपल्या आश्रमात जागा दिली व  त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनात तेथे राहू लागली. दोन महिन्यानंतर आधार कार्ड बनवून देतो म्हणून प्रयाग त्या महिलेस नागपूर घेऊन गेला. बाळ बेकायदेशीर दत्तक देण्याची मूळ कागदपत्रे तयार करून परस्पर एका दाम्पत्यास  बाळाला दत्तक दिले. त्या चिमुकल्याला आईपासून विभक्त केले. 

हेही वाचा - शेतकऱ्याने लढवली शक्कल; शेतपिकांच्या सुरक्षेसाठी...

संबंधित प्रकरणाची माहिती वर्धा येथील चाईल्ड  लाईन विभागला मिळताच त्यांनी सदर महिलेकडून हकीकत जाणून घेतली. त्यावरून  आरोपीवर बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून बाल कल्याण समितीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर यांना चौकशीचे आदेश दिले. बुटीबोरी पोलिसांनी प्रयाग डोंगरे यास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. वर्धा चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक मोडक, नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा आदींच्या प्रयत्नाने विभक्त झालेले मायलेक एकत्र आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested man for illegally adopting a child in butibori of nagpur